आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा गुरुपीठाच्या विश्वस्तां कडून सुमारे १ कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेच्या माहेरच्या घरातून रोकड व साेन्याचे, हिर्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत दागिन्यांसह रोकड असा सुमारे ४७ लाखांचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे.
दरम्यान, खंडणीखोर मायलेकांसह तिच्या भावाच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा गुरुपीठाचे विश्वस्त निंबा शिरसाठ (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सारिका बापूराव सोनवणे, मोहित बापूराव सोनवणे व तिचा भाऊ विनोद सयाजी चव्हाण या तिघांना पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक केली आहे.
याप्रकरणाचा तपास करणाऱ्या शहर पोलिसांच्या पथकाने संशयित सारिका सोनवणे हिचे माहेर असलेल्या देवळा येथील शेतातील घरातून आणखी ८ लाख रुपयांची रोकड व ५ लाख रुपयांचे सोन्याचे, हिऱ्याचे दागदागिने जप्त केले आहेत.
आत्तापर्यंत पोलिसांनी सारिका सोनवणे हिच्या पाथर्डी फाटा परिसरातील घरातून, व देवळा येथील माहेरच्या घरातून दागदागिन्यांसह रोकड असा सुमारे ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, सारिका, मोहित व विनोज यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी (ता.२२) न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, संशयितांनी १ कोटींची खंडणी उकळली आहे. त्यापैकी ४७ लाख रुपयेच हस्तगत झाले असून, अजूनही रक्कम हस्तगत करायची आहे.
तसेच या प्रकरणात आणखी संशयित असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी संशयितांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार, न्यायालयाने तिघा संशयितांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता.२४) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदरील गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे या करीत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यात संशयित महिलेने ज्या आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून निंबा शिरसाठ यांना धमकावत खंडणी उकळली, त्या व्हिडिओतील सत्यता पडताळणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस सध्या खंडणीतील एक कोटींची रक्कम हस्तगत करण्याच्या दिशेने तपास करीत आहेत.