बेमोसमी पावसात निफाड व बागलाणला शेतकऱ्याचा मृत्यू; जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान
बेमोसमी पावसात निफाड व बागलाणला शेतकऱ्याचा मृत्यू; जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान
img
दैनिक भ्रमर

नाशिक - नाशिक जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या बेमोसमी पावसाने निफाड व बागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर सुरगाणा, इगतपुरी, पेठ सह काही तालुक्यांमध्ये नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये 13.6 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात रविवारी तसेच पुढील दोन-तीन दिवस बेमोसमी पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या बेमोसमी पावसामुळे द्राक्ष पिकांना फटका बसलाच आहे परंतु या पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील फणस पाडा येथे शेतकरी गणेश देवाजी पवार यांचा बैल वीज पडून मृत्यू पावला.

बागलाण तालुक्यातील भाबटा साल्हेर या ठिकाणी शेतीमध्ये काम करणारा सुरेश मुरलीधर ठाकरे हा 35 वर्षीय शेतकरी शेतामध्ये काम करत असताना वीस पडून मृत्यू झाला तर निफाड तालुक्यातील पिंपळस या ठिकाणी सुभाष विठोबा मत्स्यसागर हा शेतकरी दुपारी शेतामध्ये काम करत असताना जोरदार गारपिटीसह पाऊस झाला. त्यामुळे गारांचा मार लागून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीने या ठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये यासह पेठ, कळवण, नांदगाव, देवळा या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तसेच चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या ठिकाणी पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या पावसामुळे चांदवड तालुक्यातील पूर्व भागात सात गावांमध्ये गारपीट झाली. या ठिकाणी कांदा द्राक्ष या पिकांच्या नुकसानी बरोबरच घरांचे देखील नुकसान झाले आहे.

निफाड तालुक्यातील 25 गावांमध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये देखील घर पडल्याने नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यात सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक पावसाला सुरुवात झाली होती. तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोर पकडला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group