नाशिक (प्रतिनिधी) :- पाण्याचे नमुने तपासणीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एकाला अटक केली आहे.
वैभव दिगंबर सदिगले (वय 48, रा. वक्रतुंड अपार्टमेंट, तिडके कॉलनी, नाशिक, मूळ रा. टिळेकरनगर, कोंढवा, पुणे) असे लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
फिर्यादी हे त्यांच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली संस्था, तसेच इतर तीन संस्थांचा केटरिंग व्यवसाय करतात. या व्यवसायासाठी जे पाणी वापरतात, त्या पाण्याचे चार नमुने तपासणी होऊन त्याचा पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी आरोपी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे वरिष्ठ अनुजीव सहाय्यक सदिगले यांनी एका नमुन्याचे पाचशे रुपये याप्रमाणे चार नमुन्यांसाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली.
ही लाच जिल्हा सार्वजनिक प्रयोगशाळेच्या नाशिक येथील त्यांच्या कक्षात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.