मोदी सरकारविरोधात उभारलेल्या इंडिया आघाडीची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला देशभरातून विरोधी पक्षांचे नेते येणार आहे. या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांकडे देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडून बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांसाठी खास डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधकांच्या या बैठकीवर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात येत आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. हे पोस्टर्स नेमके कुणी लावले? याचा उल्लेख बॅनर्सवर दिस नाहीये. परंतु, सध्या हे बॅनर्स शहराचा चर्चेचा विषय ठरत आहेत.
उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा विसर पडला
इंडिया आघाडीच्या बैठकीवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा विसर पडला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जम्मू-काश्मिरचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली होती. आज त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत. अशी टीका केसरकर यांनी केली.
दरम्यान बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरे पायदळी तुडवत आहेत. उद्धव ठाकरेंना ५ वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले असते तर त्यांनी युती केली असती. २०१४ मध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते, त्यावेळी शरद पवार यांनीच भाजपला बाहेरुन बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता, असा टोलाही केसरकरांनी लगावला.
दरम्यान, इंडिया आघाडीचे आलेले नेते बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन त्यांना वंदन करणार आहेत का? मला एका दिवसाचा पंतप्रधान करा मी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम रद्द करीन असं बाळासाहेब म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंची ३७० कलमावर चर्चा करण्याची हिंमत आहे का? असा खोचक सवाल देखील केसरकरांनी केला.