मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह रविवारी रात्री अचानक मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्या बहिणीवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अमित शाह रात्री ९.३० वाजता मुंबईत पोहचले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईत पोहचल्यानंतर ते थेट गिरगाव येथील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहिणीची विचारपूस करण्यासाठी गेले. अमित शाह मुंबईत दाखल झाल्याचे कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रात्री हॉस्पिटलमध्ये पोहचले होते.
शाह आणि मुख्यमंत्री शिंदे हॉस्पिटलमध्ये येताच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. याठिकाणी अमित शाह यांनी बहिणीच्या उपचाराबाबत माहिती घेतली. त्याचसोबत डॉक्टरांशी पुढील उपचारावर चर्चा केली. रात्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईकही होते. शाह हे जवळपास २ तास हॉस्पिटलमध्ये बहिणीसोबत होते. हा त्यांचा पूर्णपणे खासगी दौरा होता. त्यानंतर ते हॉस्पिटलमधून निघाले.
याठिकाणी हॉस्पिटलमध्ये अमित शाह यांना भेटण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीही हजर होते. शाह अचानक मुंबई दौऱ्यावर आल्याने हॉस्पिटल परिसरात सुरक्षा वाढवली आणि वरिष्ठ अधिकारीही हॉस्पिटलमध्ये पोहचले.