८ वर्षांपासून रेशन मिळत नसल्याने नाशिकरोडला इसमाचा ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न
८ वर्षांपासून रेशन मिळत नसल्याने नाशिकरोडला इसमाचा ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):- गेल्या आठ वर्षांपासून रेशनकार्ड बंद असल्याने रेशन मिळत नाही, पुरवठा कार्यालयात किती चकरा मारायच्या असा आरोप करीत एका इसमाने पत्नी समोर नाशिकरोड येथील पुरवठा विभागाच्या कार्यालयात ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महतेचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. 

मुंबईवरून रेल्वेने अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकरोडला येणार असल्याच्या तासभर अगोदर ही घटना घडल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या.

धुळे जिल्ह्यातील सडगाव मधील बापू बारकू पाटील हे पत्नी व चार मुलांसह नाशिकरोड येथील चेहडी पंपिंग येथे मोलमजुरी साठी स्थायिक झाले. त्यांनी धुळे तहसील कार्यालयाकडून तेथील रेशनकार्ड बंद करून ते नाशिकरोड येथे वर्ग करण्याबाबत पत्रपुरवठा केला. त्या अनुषंगाने पाटील यांनी नाशिकरोड येथील पुरवठा विभागात धुळे तहसील यांचा नावे कमी करण्याचा दाखला सादर करीत रीतसर नोंदणी केली.

पुरवठा विभागाने त्यांना नाशिकरोड मधील रेशनकार्ड दिले. मालधक्का रोड वरील रेशन दुकानात गेल्यावर पाटील यांना सांगण्यात आले की, तुमचे कार्ड अपडेट झाले नसल्याने तुम्हाला रेशन मिळणार नाही. त्या नंतर त्यांनी जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी यांना वेळोवेळो पत्रव्यवहार केला. मात्र अपडेट करण्याची व्यवस्था ही दिल्ली येथे असून अपडेट होण्यासाठी वेळ लागेल.

रेशनकार्ड दिले, पुरवठा विभागाच्या दप्तरी नोंद आहे, तरी देखील रेशन मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या बापू पाटील यांनी पत्नी सोबत कार्यालयातील रेकॉर्ड विभागात जात गनिमी काव्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

शेजारी उभ्या असलेल्या सामाजिक कार्यकर्ता मंदा मथुरे व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या लक्षात सदरची बाब येतात त्यांनी पाटील यांना धरून ज्वलनशील पदार्थाची बॉटल घेतली व खिशातील दोन आगपेटीचे बॉक्स ताब्यात घेतले. पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सदर इसमास पोलीस ठाण्यात आणले. पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा या कारणावरून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत सात तहसीलदार यांना पत्रव्यवहार केल्याचे व ते बदलून गेल्याचे पाटील म्हणाले.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ हे संध्याकाळी मुंबईवरून नाशिकला रेल्वे मार्गे येत असताना अवघ्या तासभराच्या अगोदर घडलेल्या घटनेने पुरवठा विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली गेली.

याबाबत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बापू पाटील यांना गेल्या चार महिन्यापासून दुकानदार धान्य देत आहे. त्याचे रेशनकार्ड पुरवठा कार्यालयात अपडेट झाले असून दुकानदाराकडे अपडेट करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. पुढील महिन्यापासून त्यांना नियमित धान्य मिळणार आहे. पुरावठा विभागाने बापू पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी अदखलपत्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group