मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे. कथित बारामती अॅग्रो घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आलीय. तर शरद पवार गट चौकशीविरोधात आज आंदोलन करण्यात येणार आहे. 24 जानेवारीलाही रोहित पवारांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती.
25 हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकघोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आमदार रोहित पवारांची तब्बल 11 तास चौकशी केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारेच ईडीने ईसीआयआर दाखल करुन चौकशीला सुरुवात केली.
२४ तारखेची चौकशी आटोपल्यानंतर रोहित पवार म्हणाले होते की, १ तारखेला मला परत बोलावलं आहे. जी माहिती त्यांनी मागवली आहे ती माहिती मी दिलेली आहे.
१ तारखेला अतिरिक्त माहिती मागवलेली आहे, तीही मी देणार आहे. मी आधी व्यावसायात आलो मग राजकारणात आलो. काही लोक आधी राजकारणात आले आणि नंतर व्यावसायात आले. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही मग त्यांनी का आम्हाला प्रश्न करायचा, हा माझा प्रश्न आहे.
रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर आणि अन्य आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आज (गुरुवारी) पुन्हा कार्यकर्त्यांनी मुंबईत गर्दी करण्यात सुरुवात केली आहे. रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी देखील केली जातेय.