बसचालकाचे प्रसंगावधानाने 25 प्रवाशांचे प्राण वाचले
बसचालकाचे प्रसंगावधानाने 25 प्रवाशांचे प्राण वाचले
img
दैनिक भ्रमर

सिल्लोड : भरधाव वेगाने रस्त्यावरील अनेक वाहनांना हुलकावणी देत जाणाऱ्या कंटेनरचालकाने एसटी बसला हुलकावणी दिली. दरम्यान सिल्लोड आगाराची एसटी बसचालकाने प्रसंगावधान दाखवित बस रस्त्याच्या खाली उतरवली. यामुळे बसमधील 24 प्रवाश्यांचा जीव वाचला. 

प्रवाश्यांचा जीव वाचविणारा चालक प्रवाश्यांसाठी देवदूत ठरला आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती बसमधील प्रवाश्यांनी अनुभवली.

सिल्लोड आगाराची बस क्रमांक एमएच 20 बीएल 1508 सिल्लोड येथून भोकरदन फेरीसाठी चालक एस. बी. जरारे घेऊन जात होते. पिंप्री फाट्याच्या पुढे गेल्यानंतर भोकरदहून सिल्लोडकडे येत असलेल्या भरधाव कंटेनरने रस्त्याच्या मधोमध जाऊन बसला हुलकावणी दिली. यामध्ये बसचालकाने प्रसंगावधान दाखवत बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न करीत बस रस्त्याच्या खाली उतरविली परंतु रस्त्याच्या खाली देखील खोल खड्डे असल्याने बस आदळत खड्ड्यात जाऊन थांबली.

अपघातामध्ये बसचालक जरारे गंभीर जखमी झाले. तर बसमधील एक ते दोन प्रवाश्यांना किरकोळ मार लागला असून, बाकी सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. याप्रकरणी सिल्लोड आगाराचे सहायक वाहतूक अधिक्षक विकास चव्हाण यांचेशी संपर्क साधला असता, त्यांनी बसचा अपघात झाला असल्याचे सांगत बसचालकाच्या प्रसंगावधामुळे प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच बसचालकास उपजिल्हा रूग्णालयात उपचार देऊन खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगत याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला नसल्याची माहिती त्यांनी दिली.


भरधाव वेगाने अनेक वाहनांना हुलकावणी देत असलेल्या कंटेनरचालकाने एका दुचाकीस्वारास देखील हुलकावणी दिली होती. कंटेनर रस्त्याच्या मधोमध जाऊन अनेक वाहनांना हुलकावणी देत होता. याचा व्हिडिओ हुलकावणी दिलेल्या दुचाकीवरील तरुण करित असतांना कंटेनर चालकाने बसवर घातलेला कंटेनर व बसचालकाने दाखविलेले प्रसंगावधान व्हिडिओमध्ये कैद झाले. यामध्ये बस आदळत रस्त्याच्या खड्ड्यात उरल्याचे स्पष्ट दिसते तर कंटेनर चालक सुसाट वेगाने सिल्लोडकडे निघून गेला.


कंटेनरचालकाने बसला दिलेली हूल बघता जर बस बाजूला घेतल्या गेली नसती तर कंटेनरने चालकाच्या बाजूची बसची सर्व बाजू कापत नेली असती, आणी मोठा अपघात होऊन अनेकांना या अपघातामध्ये जीव गमवावा लागला असता. परंतु बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचून मोठा अनर्थ टळला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group