आज केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.
यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत ही मागणी केली आहे.
दरम्यान ते म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. तसेच बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.
देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल," असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.