‘महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला’, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
‘महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला’, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
img
Dipali Ghadwaje
नाशिक : राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, अशी बोचरी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस  यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी संदर्भात ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्या घटना गंभीरच आहेत, ते मी नाकारत नाही. त्यामुळे या घटनांचा राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे योग्य नाही. प्रत्येक घटनांमागे वैयक्तिक कारणे किंवा हेवेदावे आहेत. त्याहीबाबत जी कारवाई करायची आहे ती आम्ही करत आहोत”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

तसेच शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता माझे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मी, 'गेट वेल सून' एवढीच प्रतिक्रिया देईन, असे फडणवीस यांनी म्हटले. 

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
  “श्वान गाडीखाली मेलं तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात. फडणवीस यांच्यासाठी मी याआधी फडतूस, कलंक असे शब्द वापरले होते. पण आता हे शब्दही तोकडे पडत आहेत. महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला होता. त्याला प्रत्युत्तर देत असताना फडणवीस म्हणाले होते की, गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.

“गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्वच प्राण्यांची आणि माणसांची जबाबदारी येते. एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही श्वानाबरोबर कशी काय करता? दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलविता, हे जनतेला समजलेले आहेच. पण राज्यात गुंडगिरी करा, खूनखराबा झाला तरी घाबरू नका… पण भाजपात आला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडासाठी मोदी गॅरंटी आहे का? असे दिसत आहे”, असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group