अंगाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना उत्तरप्रदेशामधून समोर आली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील बलिया परिसरातील सुघर-छपरा वळणावर मंगळवारी (२७ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास घडली. देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. देवदर्शन करून घरी परतताना सर्वजण आनंदात होते. गाणी आणि ट्रिपच्या आठवणीत घरी चालले होते. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अपघात होताच रस्त्यावर आरडाओरडा आणि किंकाळ्या ऐकू आल्या.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतले, तसेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. ज्यांची प्रकृती नाजूक आहे त्यांना वाराणसीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना गमवल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कार आणि पिकअपचा चक्काचूर झाला. पिकअप आणि कार देखील भरधाव वेगात होती. धडकेत कार हवेत उडून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यासह पिकअपच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात पिकअपमधील काही व्यक्ती देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.