नवीन नाशिक (प्रतिनिधी) :- गेल्या तीन वर्षांपासून 17 हजार 044 युनिटची वीजचोरी करून महावितरण कंपनीची 4 लाख 67 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हरेश रामचंद्र भावर (रा. ठाणे पश्चिम) हे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत. भावर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास चेतनानगर येथील आरोपी पांडुरंग महादू आव्हाड (वय 46) यांच्या घरी वीजचोरीची तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पथकाने वीजबिलाची मागणी करून वीजपुरवठा तपासणीसाठी सुरुवात केली असता या वीज मीटरच्या सीलची छेडछाड करून चोरीची वीज वापरत असल्याचे आढळून आले.
वीज वापरदार प्रतिनिधी यांच्यासमक्ष मीटर उघडून तपासणी केली असता त्यातील सीटी सेकंडरी वायर कापल्याचे आढळून आले. दरम्यान, आरोपी पांडुरंग आव्हाड यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची फसवणूक करून मागील 33 महिन्यांत 17 हजार 44 युनिटची वीजचोरी करून 4 लाख 66 हजार 870 रुपयांची वीजचोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गारले करीत आहेत.