महाराष्ट्रातील अनेक भागांत उन्हाचा कडाका जाणवू लागला असला तरी पुढील २४ तासांत विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. याशिवाय, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहिल, अशीही माहिती हवामान विभागाने दिली.
मुंबई, पुणे सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. तर, विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत आजपासून येत्या १८ मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक भगात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. ज्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
जम्मू - काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या १७ मार्चपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.