नाशिकमध्ये  3 ठिकाणी 6 लाख रुपयांची वीजचोरी
नाशिकमध्ये 3 ठिकाणी 6 लाख रुपयांची वीजचोरी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरातील पाथर्डी, पाथर्डी फाटा व वडनेर दुमाला येथे वीज वितरण कंपनीच्या पथकाने छापे टाकून सुमारे सहा लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून, चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीजचोरीचा पहिला प्रकार पाथर्डी येथे घडला. याबाबत हरेश रामचंद्र भावर (रा. समतानगर, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. भावर हे महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ठाण्याच्या भरारी पथकाने काल (दि. 27) दुपारी संशयित सोनाली धनंजय आहिरे व धनंजय आहिरे (दोघेही रा. कीर्तन रेसिडेन्सी, मुरलीधरनगर, पाथर्डी, नाशिक) यांच्या घरी छापा टाकला.

त्यावेळी तपास पथकाने वीज मीटरची तपासणी केली असता त्यात दि. 4 ऑगस्ट 2022 ते 15 मार्च 2024 या कालावधीत मीटरमध्ये छेडछाड करून 6 हजार 876 युनिटची वीजचोरी करून 1 लाख 53 हजार 680 रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी आहिरे दाम्पत्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात वीज कंपनी व शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो इंदिरानगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

वीजचोरीचा दुसरा प्रकार वडनेर दुमाला येथे घडला. याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता हरेश भावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी शंकर पांडे (रा. तलाठी ऑफिसजवळ, आर्टिलरी सेंटर रोड, वडनेर दुमाला, नाशिक) यांच्या घरी महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला. त्यावेळी पथकाने केलेल्या पाहणीत आरोपी पांडे यांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून 11 हजार 620 युनिटची वीजचोरी करून महावितरणची सुमारे 2 लाख 30 हजार 130 रुपयांची फसवणूक केली.

हा वीजचोरीचा प्रकार दि. 2 डिसेंबर 2020 ते दि. 16 मार्च 2024 या कालावधीत घडला. या प्रकरणी प्रथम नाशिकरोड पोलीस ठाण्यात शंकर पांडे यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तो उपनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

वीजचोरीचा तिसरा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. आरोपी पंढरीनाथ पोपटराव चौधरी (रा. अलकनंदा अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्या घरी महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी भरारी पथकाने केलेल्या तपासात आरोपी पंढरीनाथ चौधरी यांनी दि. 17 डिसेंबर 2016 ते दि. 16 मार्च 2024 या कालावधीत वीज मीटरमध्ये छेडछाड करून 10 हजार 490 युनिटची वीजचोरी करून 2 लाख 7 हजार 210 रुपयांची महावितरणची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी आरोपी चौधरी यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरेश रामचंद्र भावर यांच्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group