चोरीला गेलेले सोने परत मिळताच पाणावले वृद्धेचे डोळे; मोलकरणीच्या पतीनेच मारला होता डल्ला
चोरीला गेलेले सोने परत मिळताच पाणावले वृद्धेचे डोळे; मोलकरणीच्या पतीनेच मारला होता डल्ला
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):- 61 वर्षांपूर्वी गुडफ्रायडेच्या दिवशी दोघांची भेट झाली. लग्न झाले आणि तेव्हा पासून नवऱ्याने प्रत्येक वाढदिवसाला भेट दिलेले सुमारे 22 तोळे दागिने चोरी गेले. मात्र, उपनगर पोलिसांनी गुडफ्रायडेलाच चोराला पकडले आणि चोरी गेलेले तेच सोने हस्तगत केले.

याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ज्येष्ठ शिक्षका असलेल्या सुहासिनी विष्णू साने (वय 81, रा. जगताप मळा, तरणतलाव रोड, नाशिकरोड) ह्या साखरपुडाच्या कार्यक्रमाला मोलकरीन चंद्रभागा पाटील यांच्या सोबत गेल्या. मात्र जाताना मोलकरीन चंद्रभागा पाटील हिने नवऱ्याला घराची चावी दिली होती.

घरात कोणी नसल्याची संधी साधून दत्तू साहेबराव पाटील याने घर उघडून कपाटातील सुमारे 22 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. मात्र चांदीचे दागिने व रोख रक्कम मात्र चोरली नाही. घटनास्थळी उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस शिपाई जयंत शिंदे, गौरव गवळी यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन संशयिताचा माग काढला. सहाय्यक निरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, अनिल शिंदे, संदेश रघतवान, पंकज कर्पे अश्या पथकांनी जळगांव, चाळीसगाव येथील ओझर, टाकळी गाव येथून मोलकरणीचा नवरा दत्तू साहेबराव पाटील यास ताब्यात घेतले.

त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत रामचंद्र कृष्णा पाटील (वय 62, रा.पंचवटी, नाशिक) याच्या नावावर एका बँकेत चोरलेले सोने गहाण ठेवले व त्या मोबदल्यात रामचंद्र पाटील यास 51 हजार रुपये दिले असे सांगितले.

या गुन्ह्यातील फिर्यादी सुहासिनी साने ह्या सेवानिवृत्त शिक्षका असून त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलिया येथे तर मुलगी मुंबई येथे राहत असून दोघेही विवाहित आहेत. साने यांना चोरी गेलेले सोने हस्तगत केल्याचे समजताच माजी नगरसेवक रमेश धोंगडे यांच्या मदतीने त्या पोलीस ठाण्यात आल्या. उपायुक्त राऊत व पोनि सपकाळे, सपोनि चौधरी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांचे डोळे पाणवले.

या दोघा संशयितांना गुन्ह्यात अटक केली असून अधिक तपास सपोनि चौधरी करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group