कवडीमोल भावात मालमत्ता हडप करून  125 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक;  छाप्यात वाचा काय काय मिळाले
कवडीमोल भावात मालमत्ता हडप करून 125 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक; छाप्यात वाचा काय काय मिळाले
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :  5 टक्के दराने व्याज घेऊन कवडीमोल भावात मालमत्ता हडप करून 125 ते 150 जणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी एका खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहकारी संस्थेचे लेखापरिक्षक रविंद्र बाबजी गुंजाळ (रा. जय योगेश्वर सोसायटी, ओंकारनगर, पेठरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामदास दशरथ मोगल यांनी सहाय्यक सहकार निबंधक निफाड यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यात म्हटले की, आरोपी प्रविण ज्ञानेश्वर काकड (वय 38, रा. मानकर मळा, मखमलाबाद) व पोपट वसंत काकड (वय 41, रा. शांतीनगर, मखमलाबाद) हे दोघे बेकायदेशीररित्या सावकारीचा व्यवसाय करतात. अशी माहिती दिली.

त्यानुसार लेखा परिक्षक सहकारी संस्था येवला यांच्या पथकाने प्रविण काकड व पोपट काकड यांच्या राहत्या घरी झाडाझडती घेतली असता. त्यात 46 करारनामे, 44 कोरे स्टॅम्प पेपर, इतर नावे असलेले 5 स्टॅम्प पेपर, 107 धनादेश, व्याज व लोकांना दिलेल्या कर्जाच्या नोंदी असलेल्या तीन डायऱ्या या छाप्यादरम्यान आढळून आल्या. त्यानंतर या पथकाने प्रवीण काकड व पोपट काकड यांची अधिक चौकशी केल असता त्यांनी सुमारे 125 ते 150 नागरिकांना कर्ज देऊन व मोठ्या रकमा देऊन दरमहा 5 टक्के प्रमाणे त्यांच्याकडून व्याज वसूल केले.

तसेच काही जणांच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन त्यांच्या मालमत्ता कवडीमोल दराने बळजबरीने हडप करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. त्याचप्रमाणे या दोन्ही आरोपींनी सावकारी करण्याचा अधिकृत परवाना नसताना गैरकायदेशीरपणे सावकारी करून गरजु व्यक्तींकडून अवाच्या सव्वा व्याज आकारुन त्यांची फसवणूक केल्याची बाब या छाप्यामध्ये लक्षात आली. 

हा प्रकार सन 2008 ते 1 एप्रिल 2024 या कालावधीत दोंदे मळा व मानकर मळा येथे घडला. याप्रकरणी रविंद्र गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात प्रवीण काकड व पोपट काकड यांच्याविरुद्ध अवैध सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकूर करीत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group