पंधरा हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेविका जाळ्यात
पंधरा हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेविका जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :15 हजार रुपयांची लाच घेताना शिंदखेडा तालुक्याच्या ग्रामसेविकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. राजबाई शिवाजी पाटील (वय 42) असे लाच घेणाऱ्या ग्रामसेविकेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की यातील तक्रारदार यांचा शेती व ठेकेदारीचा व्यवसाय असून त्यांनी चौगाव, ता. शिंदखेडा या ग्रामपंचायत हद्दीत पेव्हर ब्लॉकचे व रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले होते. या कामाचा निधी मंजूर होऊन ग्रामपंचायतच्या बँक खात्यात जमा झालेला होता.

तक्रारदार यांना त्यांच्या देयकापोटी धनादेश अदा करण्यासाठी राजबाई पाटील यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती पाटील यांनी 15 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो. ना. संतोष पावरा, पो. शि. मकरंद पाटील,  प्रविण पाटील, बडगुजर यांनी केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group