विशाल पाटील चांगल नेतृत्व आहे, पण आता आघाडीत ती जागा सेनेला सुटली आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी ते फार्म मागे घेऊन चंद्रहार पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील', असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहे.
यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, सांगलीतून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. ते म्हणाले आहेत की, मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज माघे घेणार नाही. याच प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ''महाविकास आघाडीच जागावाटप झालं आहे. कोणत्या पक्षाचा पदाधिकारी अशा प्रकारे अपक्ष निवडणूक लढत असेल, तर निवडणूक फक्त एका मतदारसंघात नाही, तर 48 मतदारसंघात आहेत.
मागील निवडणुकीत विशाल पाटील हे शेतकरी संघटनेकडून उभे होते, काँग्रेसकडून नव्हते. याबाबतीत काँग्रेसचं नेतृत्व योग्य ती पावले उचलतील.''
दरम्यान दानवे म्हणाले की, ''विशाल पाटील हे चांगले, कार्यकर्ते आणि चांगलं नेतृत्व आहे. मात्र महाविकास आघाडीत शिवसेनेला ही जागा सुटली असल्याने सेना येथून लढेल. ती जागा हवी होती, तर काँग्रेसने ती महाविकास आघाडीत सोडून घ्यायला हवी होती. मात्र तसं झालं नाही. म्हणून आता येथून चंद्रहार पाटील लढतील आणि मला असं वाटतं विशाल पाटील यांच्यावरही तेव्हा अर्ज मागे घेण्याची वेळ येईल, त्यावेळी ते चंद्रहार पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील.''
दरम्यान, मंगळवारी सांगलीत विशाल पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, ''काँग्रेस एकसंघ होती, हे कुणाला बघवले नाही. काँग्रेस पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मिळू दे, मी माघार घेईन. पण काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपवून जावेत, असा उद्देश काही जणांचा आहे, मला अजून ही विश्वास आहे. मला उमेदवारी मिळेल.''
चंद्रहार पाटील यांना लक्ष्य करत ते म्हणाले होते की, ''कोणीतरी आरोप केला, शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहवत नाही का? वसंतदादा यांच्या घराण्याने शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद देण्याचं काम केलेलं आहे. आमची तीच भावना आहे, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार, आमदार झालं पाहिजे. पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे, हे सुद्धा पाहण्याची जबाबदारी आमची आहे.''