योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट; चर्चांना उधाण
योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट; चर्चांना उधाण
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (प्रतिनिधी) :- देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते योगेश घोलप यांनी आज मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान ही केवळ सदिच्छा भेट होती अशी माहिती योगेश घोलप यांनी दिली. या भेटीचे फोटो वाऱ्यासारखे पसरल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

गेल्या आठ दिवसापासून शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे घोलप यांचा राजीनामा ठाकरे गटाच्या पक्ष श्रेष्ठींनी स्वीकारला नसला तरी त्यांना वेट अँड वॉच ठेवले आहे.

त्याचप्रमाणे त्यांना चर्चेसाठी मातोश्रीवरून अद्यापही निरोप अथवा फोन आला नसल्यामुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्वतः घोलप सुद्धा याबाबत नाराज आहे मात्र घोलप हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे घोलप यांच्या समर्थनार्थ आज रविवार दिनांक 17 रोजी छत्रपती शिवाजी पार्क मुंबई दादर येथे चर्मकार समाजाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

तर दुसरीकडे बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान या संदर्भात योगेश घोलप यांच्याशी संपर्क साधला असता शरद पवार हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असून ठाकरे गट महाविकास आघाडी गटाचा एक घटक आहे.

त्यामुळे आपण त्यांचे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले असे योगेश घोलप यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी दिनेश धात्रक उमेश खातळे मनोज पालखेडे शिवसेना ठाकरे गटाचे नितीन चिडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group