Nashik Crime : व्यावसायिकाकडून दीड लाखाची रोकड बळजबरीने लुटली
Nashik Crime : व्यावसायिकाकडून दीड लाखाची रोकड बळजबरीने लुटली
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- बॅनर व्यावसायिकाला रस्त्यात आडवून त्याच्याकडील दीड लाख रुपयांची रोकड बळजबरीने लुटणाऱ्या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी फातिमा मुस्तफा शेख (वय 32, रा. उदय कॉलनी, पवननगर, सिडको) यांचे पती मुस्तफा यांचे खेतवानी लॉन्स समोरील गाळ्यांमध्ये डिजिटल बॅनरचे दुकान आहे. मुस्तफा हे 23 एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानावर गेले. तसेच फिर्यादी फातिमा शेख या दिवसभराचे काम उरकून सायंकाळी घरी आल्या. मात्र घरातील कामे उरकून त्या कुटुंबियांसह झोपण्याच्या तयारीत होत्या.

परंतु रात्रीचा दिड वाजला तरी पती घरी आले नाही म्हणून त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांचा फोन लागला नाही. फातीमा यांचे पती हे कामानिमित्त कधी कधी बाहेरगावी जात असत. कदाचित आजही ते कामानिमित्त कुठे तरी गेले असतील किंवा त्यांच्या फोनची बॅटरी उतरली असेल म्हणून त्यांनी फोन केला नाही असे समजून त्या झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा त्यांच्या पतीला फोन केला. मात्र फोन बंदच येत होता. 

दरम्यान फातिमा शेख या काल त्या काम करत असलेल्या व्होडाफोन कंपनीच्या ऑफिसमध्ये असताना त्यांना 8617429907 या क्रमांकावरुन फोन आला. समोरुन त्यांचे पती मुस्तफा बोलत होते. ते म्हणाले की, 23 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास कामानिमित्त इंदिरानगर येथे सम्राट स्वीट्स परिसरात गेले होते. त्यावेळी मुस्तफा शेख यांना त्यांच्या ओळखीचे सुलतान भाई उर्फ सलिम कुरेशी (रा. देवळाली कॅम्प) व त्यांचे मित्र यांनी संगनमत करुन मुस्तफा शेख यांना सम्राट स्वीटजवळ अडवून दमदाटी केली. तसेच शेख यांच्याकडे व्यवसायातून आलेली दीड लाख रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेतली.

त्यानंतर आरोपी हे शेख यांना देवळाली कॅम्पकडे घेऊन जात असताना त्यांनी आरोपींच्या हाताला हिसका देऊन तेथून पळ काढला. असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी फातिमा शेख या प्रथम अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तेथे जबाब नोंदवून त्यांना तक्रार देण्यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group