मालेगावजवळ झोडगे शिवारात भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. सुदैवाने या हल्ल्यात कोणीच जखमी झाले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान दोन जण एका दुचाकीवर आले. त्यांनी दमबाजी व शिवीगाळ करत मालक कुठे आहे अशी विचारणा केली. कर्मचाऱ्यांकडे त्यांनी १५ पेटी द्या अशी मागणी केली.
दरम्यान, पंपावरील कर्मचारी व प्रवासी येत असल्याचे पाहून एका कर्मचाऱ्याच्या हातातील मोबाईल लुटून दोघे फरार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या गोळीबार व लुट प्रकरणी भरत दादाजी बच्छाव यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने लुट केलेल्या मोबाईलचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवत लोकेशनच्या आधारे संशयितांचा धुळे व परिसरात माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पंपावर लुटलेला मोबाईल पोलिसांना धुळे येथील शनि मंदिराजवळ मिळून आला. त्यावरुन संशयित धुळे येथील असावेत असा अंदाज वर्तविला जात आहे. संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.