"या" तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा धुमाकूळ, "इतक्या" जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
पश्चिम बंगालमध्ये आलेल्या ‘रेमाल’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. राज्यातील वातावरण बदलले आहे. सोमवारी सर्वत्र आभाळ आले आहे. रविवारी संध्याकाळी राज्यातील अनेक भागांत वादळी वारा आला. सोलापूर आणि धारशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. या वादळी वाऱ्यामुळे सोलापूरच्या माढ्यात तुफान पाऊस झाला.

अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले. धारशिवमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाले. धाराशिव येथे वादळी वाऱ्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात घडली. राज्यात दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

शेतांमध्ये पाणी साचले

सोलापूरच्या माढ्यात रविवारी दुपारी ते सायंकाळच्या सत्रात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने अनेकांची झोप उडवली. माढा शहरासह अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. पिकांचे नुकसान झाले. घरावरील पत्रे उडाले. वादळी पावसाने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापुरात आलेल्या वादळी वाऱ्यात पेट्रोल पंपाचे छत कोसळले. मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्या जवळील पेट्रोल पंपाचे छत कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

पत्र्यामुळे एकाचा मृत्यू

धाराशिव येथे वादळी वाऱ्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. हनुमंत कोळपे असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरावरील पत्रे उडून गेल्याने दगड डोक्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. धाराशिव तालुक्यातील सांगवी या गावातील घटना आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस

जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथे अवकाळी पावसामुळे तब्बल 3 बिघ्यांवरील केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या आहेत. तोडणीला आलेली केळीची बाग जमीन दोस्त होऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळीची बाग जमीन दोस्त होऊन तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात चौघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे रविवारी अनेक ठिकाणी नुकसान झाले. यावल तालुक्यात वादळी वार्‍यामध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. नानसिंग गुना पावरा (वय 28), सोनाबाई नानसिंग पावरा (वय 22), रतीलाल नानसिंग पावरा (वय 3) बाली नानसिंग पावरा (वय 2) असे मयत कुटुंबातील सदस्यांचे नाव आहेत. सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी या आदिवासी पाड्यावर ही घटना घडली. या घटनेत कुटुंबातील पती-पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे. या कुटुंबातील चौघांचे शव बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

मलकापूर पोलीस ठाण्याला वादळाचा फटका

वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका मलकापूर पोलीस स्टेशनला बसला आहे. पोलीस स्टेशन इमारतीवरील पत्रे उडाली आहे. तसेच परिसरातील झाड ही पडले आहे. पोलीस ठाण्यातील क्राईम रेकॉर्ड भिजले आहे. तसेच संगणक, लॅपटॉपचे ही नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फटका

सिल्लोड तालुक्यात असलेल्या टिटवी, पळसखेडा या गावांमध्ये रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने परिसरात तांडव केला. यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टाळली. मात्र दोन दिवसांमध्ये आठ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. यामुळे मिरची पेरणीला देखील फटका बसला आहे. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी बोदवड, उंडणगाव, बहुली, हट्टी, शेखपुर, शिरसाळा, आंभई, सिल्लोड इत्यादी गावांना या वादळी वाऱ्याचा फटका बसला. खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल आहे. नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group