श्रीरंग सारडा यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर
श्रीरंग सारडा यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर
img
दैनिक भ्रमर
नाशिक :  रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘नाशिक भूषण २०२४’ पुरस्कार उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीरंग किसनलाल सारडा यांना जाहीर झाला आहे. तर रोटरी भूषण पुरस्कार ख्यातनाम उद्योजक रोटे. रविंद्र महादेवकर आणि रोटे. महाराज बिरमानी यांना घोषित करण्यात आला. येत्या शनिवारी (दि. ८) कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते आणि सुधीर मुतालिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
 
नाशिक ही ज्यांची जन्मभूमी अथवा कर्मभूमी आहे आणि ज्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:बरोबर नाशिकचे नाव उज्ज्वल केले अशा व्यक्तींना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची संकल्पना १९९६-९७ पासून रोटरी क्लब राबवित आहे.

यंदाचे नाशिक भूषण श्रीरंग सारडा यांची नाशिक ही कर्मभूमी असून उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे अतुलनीय काम आहे. सिटी सेंटर मॉल, ऑरगॅनिक दूध, कंठ सुधारक वटी अशा विविध उद्योगांच्या माध्यमातून सुमारे १५ हजारांहून अधिक रोजगार त्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे विडी कामगारांच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली आहे. वेद शाळा, वेद मंदिर, गावागावात माऊली अभ्यासिका, पंढरपूर आणि आळंदी येथे धर्मशाळांची निर्मिती त्यांनी केली आहे. 
 
रोटरी क्लब ऑफ नाशिक हि संस्था गेल्या ८० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विविध भागात लोकविकासाचे बहुतांश प्रकल्प राबविण्यात येतात.

सामाजिक विकासात आपले बहुमोल योगदान देणाऱ्या रोटरी संस्थेच्या सहकाऱ्यांचादेखील यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने मागील यावर्षीपासून रोटरी भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुसरा सन्मान ख्यातनाम उद्योजक रविंद्र महादेवकर आणि महाराज बिरमानी यांना घोषित करण्यात आला आहे. श्री. रविंद्र महादेवकर यांचा रोटरी संस्थेच्या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो.

त्याचप्रमाणे निधी संकलनात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या या सामाजिक दायित्वाची रोटरीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील नोंद घेण्यात आली आहे. तर उद्योजक महाराज बिरमानी यांची सन १९६७ पासून रोटरीशी त्यांची बांधिलकी आहे. देवळाली कॅम्प परिसरात ते गरीब आणि गरजूंसाठी तीन पुरी भाजी केंद्रे चालवितात. त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याची आरोग्याची काळजी घेऊन उपचारही दिले देतात. एकंदर सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
 
याप्रसंगी उद्योजक राम भोगले नाशिकला उद्योग क्षेत्रात चालना देण्यासंदर्भात संवाद साधणार आहेत. तर उद्योजक सुधीर मुतालिक हे जीडीपी वाढीचा सामान्य जनजीवनावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयावर हितगुज करणार आहेत. शनिवारी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यास नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष, मंगेश अपशंकर, मानद सचिव डॉ. गौरव सामनेरकर, हेमराज राजपूत, नाशिक भूषण पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा सीए रेखा पटवर्धन, जनसंपर्क संचालक विनायक देवधर, संतोष साबळे आदींनी केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group