पाऊले चालती पंढरीची वाट...! संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी, उद्या आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून रवाना होणार
पाऊले चालती पंढरीची वाट...! संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी, उद्या आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून रवाना होणार
img
Mukund Baviskar
नाशिक :  संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा वारकरी सांप्रदायाच्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी संपूर्ण राज्यातून आषाढी एकादशीसाठी संताच्या पालख्या जातात, त्यात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचा समावेश आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी चांदीच्या रथातून उद्या गुरुवारी (दि. २०) आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघणार आहे. या पालखीत ५१ दिंड्यांसह हजारो वारकरी सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे यंदा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या रथावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कोणालाही बसण्याची प्रवानगी असणार नाही, वारीदरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी यंदा प्रथमच या रथावर तक्रारपेटी बसवण्यात येणार आहे. 

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वरहून गुरुवारी दुपारी दोन वाजता समाधी मंदिरापासून पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. प्रथम कुशावर्त तीर्थावर स्नान, पूजा होईल. मेनरोडने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून पालखी निघेल, उत्तर ४७ दिंड्या निवृत्तिनाथ पालखीसोबत तर पालखीपुढे नेहमीच्या मानाच्या ४ दिंड्या अशा ५१ दिंड्या असतील. पंढरपूरच्या मार्गावर गावोगावातून सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या एक लाखापर्यंत पोहोचते.

त्र्यंबकेश्वर येथून निघाल्यानंतर २ किलोमीटरवरील पेगलवाडी येथील श्री पंचायत महानिर्वाण आखाडा येथे पालखी मुक्कामास थांबणार आहे. त्र्यंबकेश्वरचे भाविक व मंडळे येथे या पालखीची भोजनाची व्यवस्था करतात. 

त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हे पायी अंतर ४५० किलोमीटर आहे. त्र्यंबकेश्वरहून २० जूनला निघणारी संत निवृत्तिनाथांची पालखी २७ दिवसांनंतर म्हणजे १६ जुलैला पंढरपूर येथे पोहोचेल. हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार असल्याने सोबत २० मोबाइल टॉयलेट आणि पिण्याच्या पाण्याचे ६ टॅकर असतील, सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची  व्यवस्थाही असणार आहे. 

वारकऱ्यांच्या सुविधेच्या दृष्टीने यंदा विशेष लक्ष देण्यात येत आहे. महिला वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता यंदा मोबाइल टॉयलेटची संख्याही वाढवण्यात आली आहे, अशी माहिती संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षा कांचन जगताप यांनी दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group