नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : हरी नामाचा गजर करीत पांडुरंगाच्या भेटी साठी निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीत पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सहभाग घेऊन सात किलोमीटर दिंडीची अनुभूती घेतली.
नाशिकरोड येथून रविवारी संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखी दिंडी दुपारच्या सुमारास मार्गस्थ झाली. पळसे गावात रात्री मुक्काम करून आज सकाळी पालखी दिंडी पुढच्या प्रवासाला निघाली.
त्यावेळी शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिंडीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. आयुक्त कर्णिक यांनी डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध टिळा तर गळ्यात टाळ घेतली तर उपायुक्त राऊत यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हरी नामाचा गजर करीत पळसे गाव ते चिंचोली गाव असा सात किलोमीटरचा दिंडी पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन अनुभूती घेतली.वारकरी गात असलेल्या भजनाला आयुक्त कर्णिक यांनी साथ देत आनंद घेतला.
सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके,नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व दिंडी बंदोबस्त अधिकारी जितेंद्र सपकाळे आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी यावेळी दिंडीत सहभागी झाले होते. प्रथमच शहर पोलीस आयुक्त दिंडी पालखीत सहभागी होतात हे समजल्यानंतर नाशिककरानी आनंद, समाधान व्यक्त केले.