नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी एका वृद्धेसह युवती व युवकाने विषारी औषध सेवन करून, तर एकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.
आत्महत्येचा पहिला प्रकार नाशिकरोड येथे घडला. सुलाबाई धुलीराम पाईकराव (वय 60, रा. एकलहरा-सामनगाव रोड, सिद्धार्थनगर, नाशिकरोड) या महिलेने दि. 21 जून रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास राहत्या घरी काही तरी विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र औषधोपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून पाईकराव यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचा दुसरा प्रकार वाघाडी येथे घडला. आदिती अमित कुमावत (वय 16, रा. मजूरवाडी, वाघाडी, पंचवटी) या मुलीने राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले. त्यावेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिचे वडील अमित कुमावत यांनी औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचा तिसरा प्रकार पंचवटीत घडला. अथर्व शरदचंद्र हांडगे (वय 19, रा. व्हीएन प्राईड, सेवाकुंज, पंचवटी) याने राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब त्याचे वडील शरदचंद्र हांडगे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी अथर्वला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचा चौथा प्रकार नाशिकरोड येथे घडला. प्रवीण विजय शिरसाठ (वय 45, रा. गोरेवाडी, नाशिकरोड) यांनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास डाऊनकडे जाणाऱ्या रेल्वे फाटक क्रमांक 90 जवळ धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची खबर दिलीप संपत आंधळे (रा. गोरेवाडी) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.