अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोन अड्ड्यांवर नाशिकमध्ये छापे
अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोन अड्ड्यांवर नाशिकमध्ये छापे
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरगुती वापराचा गॅस अवैधरित्या मशिनच्या सहाय्याने वाहनात भरणाऱ्या पेठरोड व सातपूर येथील दोन अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अंमदार मुख्तार शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी धनराज सदानंद गणेशकर (वय 18, रा. आरटीओजवळ, पंचवटी), विकी नरसिंग ठाकूर (रा. गजवक्रनगर, नाशिक) व विशाल शांताराम भुसारे (वय 37, रा. शांतीनगर, मखमलाबादरोड) हे तिघे जण काल दुपारी पावणे चारच्या सुमारास पेठरोडवरील अश्वमेधनगरमध्ये समर्थ किराणा दुकानाच्या पाठिमागे एका पत्रच्या शेडमध्ये त्यांच्या ताब्यातील गॅस भरण्याच्या मशिनच्या सहाय्याने घरगुती वापरासाठी असलेला गॅस वाहनामध्ये नोझलच्या सहाय्याने भरताना मिळून आले.

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी आरोपी गणेशकर व ठाकूर हे विशाल भुसारे याच्या मारुती ओम्नी कार (क्र. एम.एच.15 बीडब्ल्यू. 5655) यामध्ये अवैधरित्या गॅस भरताना मिळून आले. याप्रकरणी त्यांच्या ताब्यातून 2 हजार रुपये किंमतीचे गॅस सिलिंडर, हजार रुपये किंमतीचे अर्धवट भरलेले गॅस सिलिंडर, 10 हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटर नोझल पाईपसह गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी मशिन, 5 हजार रुपये किंमतीचा वजनकाटा तसेच दीड लाख रुपये किंमतीची मारुती व्हॅन असा एकूण 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार वसावे करीत आहे. 

दुसऱ्या घटनेत पोलीस अंमलदार तेजस मते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी शेखर रमेश विसपुते (रा. मयुरेश्वर अपार्टमेंट, अशोकनगर, सातपूर) हा काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास भंदुरे मळ्याकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला निलेश शेवरे यांच्या गोठ्याजवळ भारत गॅस कंपनीचा घरगुती वापराचा गॅस बेकायदेशीररित्या एका मशिनद्वारे ज्वलनशिल स्फोटक पदार्थ वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वत:च्या फायद्यासाठी साहित्यासह आढळून आला.

यावेळी त्याच्या ताब्यातून 17 हजार रुपये किंमतीचे घरगुती वापराचे 17 सिलिंडर, 7 हजार रुपये किंमतीचे रिकामे गॅस सिलिंडर, 15 हजार रुपये किंमतीचा गॅस भरण्यासाठीचा पिस्टल, इलेक्ट्रिक मोटार असलेली एक मशिन, 15 हजार रुपये किंमतीची आणखी एक मशिन, 5 हजार रुपये किंमतीचा वजनकाटा तसेच 650 रुपये रोख असा 74 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस पथकाने या अड्ड्यावर छापा टाकून हस्तगत केला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात शेखर विसपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नळकांडे करीत आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group