रस्ते अपघातांच्या घटनानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशातच जालना जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस थेट पूलाखाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यातील ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघाली होती.
मध्यरात्रीच्या सुमारास ती बदनापूर येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. ही घटना छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ घटना घडली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बदनापूर व जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये २५ प्रवाशी जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून जखमेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.