Nashik : अल्पवयीन मुलीवर ९ वर्ष लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम सावत्र बापास जन्मठेप
Nashik : अल्पवयीन मुलीवर ९ वर्ष लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम सावत्र बापास जन्मठेप
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सावत्र मुलीवर तब्बल सुमारे ९ वर्षे लैंगिक अत्याचार करणार्‍या सुनील टिप्पा पंथीकर (वय ३७) या नराधमास कोर्टाने जन्मठेप, तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात बालिकेच्या आईने फिर्याद दाखल केली होती. याबाबत माहिती अशी, की आरोपी सुनील पंथीकर हा पीडितेचा सावत्र पिता असून, पीडितेची आई कामावर गेल्यानंतर तो आपल्या सावत्र मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार व दमदाटी करीत होता. हा प्रकार सन २००९ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत वेळोवेळी टागोरनगर येथे घडला होता.

या प्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिल्यानंतर उपनगर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ (२) (आय), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ च्या कलम ४, ५, ८ व ९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या तेली यांनी करून जिल्हा सत्र न्यायालयात खटला पाठविला होता.

या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ९ च्या न्या. श्रीमती व्ही. एस. मलकापट्टे-रेड्डी यांच्यासमोर चालून त्यांनी आरोपीस भा. दं. वि. कलम ३७६ (२) (३) अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली, तसेच भा. दं. वि. कलम ३७६ (२) (एन) अन्वये आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पीडितेची आई साक्ष तपासणीदरम्यान फितूर झाली होती. तरीही अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. सुलभा सांगळे यांनी प्रभावीपणे कोर्टात बाजू मांडली व आरोपीस जन्मठेपेसह २० हजारांची दंडाची शिक्षा झाली.

या गुन्ह्यात आरोपीस शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी परिश्रम घेतलेल्या कोर्ट पैरवी हवालदार, कोर्ट अंमलदार यांच्या यशाबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त मोनिका राऊत, तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group