नाशिकमध्ये बंटी-बबलीने घातला साडेसहा लाखांचा गंडा
नाशिकमध्ये बंटी-बबलीने घातला साडेसहा लाखांचा गंडा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इन्शुरन्स काढून देतो, असे सांगून एका इसमाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे घेऊन त्याआधारे त्यांच्या बँक खात्यातून परस्पर साडेसहा लाख रुपयांची रक्कम ट्रान्स्फर करून घेत बंटी-बबलीने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी काळू सखाराम कडाळे (वय 55, रा. कडाळे वस्ती, आळंदी कॅनॉलजवळ, म्हसरूळ शिवार) हे शेतकरी असून, ते शेती करतात. दि. 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एक अनोळखी मुलगा व मुलगी हे दोघे जण कडाळे यांच्या घरी आले. “तुम्हाला आम्ही इन्शुरन्स काढून देतो,” असे सांगत या दोघा बंटी-बबलीने त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे घेऊन त्यांना बँक ऑफ इंडियाच्या म्हसरूळ शाखेत नेले.

तेथे जाऊन कडाळे यांचे अर्ज भरून घेतले व कडाळे यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून त्या दोन्ही अनोळखी मुलामुलीने त्यांच्या आयसीआयसीआय या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे 6 लाख 50 हजार रुपये परस्पर वर्ग करून घेत फिर्यादी कडाळे यांची फसवणूक केली. ही बाब लक्षात येईपर्यंत अज्ञात मुलगा-मुुलगी तेथून पसार झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group