२५ जुलै २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेजारी राहणार्या महिलेने पाच जणांच्या साथीने कटकारस्थान करून वृद्धेच्या बँक खात्यावरील सव्वा कोटी रुपयांची रक्कम आई, वडील, भाऊ व इतरांच्या बँक खात्यावर वर्ग करून वृद्धेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विस्मस मेरी जेरेमीह (वय 88, रा. मिहिर सोसायटी, दत्तमंदिर रोड, नाशिकरोड) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. जेरेमीह यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिकरोड शाखा, पंजाब नॅशनल बँक नाशिकरोड शाखेत खाते आहे. या दोन्ही बँकांचे चेकबुक व पासबुक फिर्यादी यांनी राहत्या घरातील हॉलमध्ये असलेल्या बेडरूममध्ये ठेवलेले होते. त्याबाबत फिर्यादी यांचा भाचा अॅन्सले याने तपासणी केली असता त्यातील एकूण 38 चेक चोरीला गेल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांनी ही माहिती फिर्यादी जेरेमीह यांना देऊन ते चेकबुक त्यांना दाखविले. फिर्यादी यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यामध्ये म्युच्युअल फंड होते आणि त्यांच्या एफडी होत्या. त्या एफडीच्या माध्यमातून फिर्यादी यांना दरमहा व्याज मिळत होते, तसेच दरमहा पेन्शनही या खात्यात जमा होत होते. ही बाब आरोपी दिशा टांक हिच्यासह किशोरभाई एन. टांक, तिची आई सरला टांक, भाऊ देवांश टांक व मित्र विकास राजपाल रहतोगी (सर्वांचे पूर्ण पत्ते माहीत नाहीत) यांना माहीत होती.
त्यानुसार प्रमुख आरोपी दिशा टांक हिच्यासह तिच्या साथीदारांनी कटकारस्थान रचून फिर्यादी जेरेमीह यांच्या घरातून चेकबुकमधील चेकची चोरी करून त्यावर फिर्यादीची बनावट सही केली व ते बँकेत सादर केले, तसेच फिर्यादी यांच्या नावे असलेली एफडीसुद्धा या आरोपींनी परस्पर तोडून दि. 1 जानेवारी 2020 ते दि. 1 ऑगस्ट 2023 या कालावधीत एकूण 1 कोटी 23 लाख 85 हजार 367 रुपयांची रक्कम चेकद्वारे काढून मुख्य आरोपी दिशा टांक हिने स्वत:च्या बँक खात्यासह आई, वडील, भाऊ व इतर मित्रांच्या खात्यावर वर्ग करून या रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून फिर्यादी जेरेमीह यांची फसवणूक केली, तसेच ही रक्कम आरोपी दिशा टांक हिने फिर्यादी जेरेमीह हे जयराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अॅडमिट असतानाही काढल्याची बाब लक्षात आली.
याबाबत आरोपी दिशा टांककडे विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर फिर्यादी जेरेमीह यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिशा टांक, किशोरभाई टांक, सरला टांक, देवांश टांक व विकास राजपाल यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाने करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar