नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शतपावली करताना मोटारसायकलीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी मंगळसूत्र खेचले खरे; मात्र मंगळसूत्राचे काही तुकडे तेथेच पडून चोरटे निघून गेले. हेच मंगळसूत्र दुसर्या दिवशी सकाळी रस्ते झाडण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचारी महिलेला मिळाले.
ते तिने प्रामाणिकपणे पंचवटी पोलीस ठाण्यात आणून दिल्याबद्दल त्या सफाई कर्मचारी महिलेचा पंचवटी पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की गेल्या दि. २१ जुलै रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास चित्रा महेश वडनेरे ही महिला तपोवनातील जी. टी. टायर, कृष्णनगर या परिसरात पतीसमवेत जेवणानंतर शतपावलीसाठी आल्या होत्या. यावेळी नेमके आलेल्या मोटारसायकलीवरील चोरट्यांनी वडनेरे यांचे मंगळसूत्र ओढून ते निघून गेले; मात्र या मंगळसूत्राचा काही भाग चोरट्यांच्या हातून खाली पडून गेला होता. या प्रकरणी त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
या घटनेचा तपास सुरू असतानाच दि. २३ जुलै रोजी पंचवटी विभागातील मनपाच्या महिला सफाई कर्मचारी अर्चना सचिन गांगुर्डे या पोलीस ठाण्यात आल्या व त्यांना सापडलेले तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांच्या हाती देऊन ते जी टी टायर येथे सफाई करताना सापडल्याचे सांगितले. दोन्ही घटनांचा संबंध जुळल्याने पोलिसांच्या वतीने दि. २५ रोजी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांच्या उपस्थितीत ज्योती आमणे यांच्या हस्ते गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक आवेश पलोड, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, राकेश साबळे हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंगळसूत्र हरवलेल्या तक्रारदार चित्रा वडनेरे यांनीदेखील सफाई कर्मचारी अर्चना गांगुर्डे यांचा पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार केला व आभार मानले. अर्चना गांगुर्डे या सफाई कर्मचारी महिलेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.