देवळा (भ्रमर वार्ताहर):- दारूच्या नशेत दोन मित्रांमध्ये वाद होऊन वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाल्याने एकाकडून दुसर्याचा खून झाल्याची घटना मटाणे (ता.देवळा) येथे काल घडली. यामुळे येथे खळबळ उडाली असून याबाबत देवळा पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मटाणे येथे कांद्याचा व्यवसाय करणारे दीपक निंबा साबळे (वय 45) व तेथील रंगकाम करणारे संतोष पवार उर्फ ज्वाल्या (वय 38) यांनी सकाळी सोबतच देवळा येथे मद्यपान केले. त्यात दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
त्यानंतर ते मटाणे येथे निघून गेले व दुपारी चार वाजेच्या दरम्यान मटाणे- कळवण रस्त्यावरील चिकनच्या दुकानाजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, संतोष पवार याने दीपक साबळे याच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी संतोष पवार याला तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर मयत साबळे याला देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
घटनेची माहिती सर्वत्र पसरताच मयताच्या नातेवाईकांनी देवळा पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी व यामागचे सूत्रधार व साथीदार यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी देवळा येथील पाच कंदीलजवळ काही काळ रस्त्यावर बसून आंदोलन केले. पोलिसांनी त्यांची समजूत काढून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला व नातेवाईकांकडून रीतसर फिर्याद नोंदवण्यास सांगितले. घटना घडून पाच तासांहून अधिक काळ लोटला तरी नातेवाईकांकडून रीतसर फिर्याद नोंदवली गेली नसल्याने पाच कंदील परिसरात तणावाचे वातावरण होते.