गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून डॉक्टरची झाली 25 लाख रुपयांची फसवणूक
गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून डॉक्टरची झाली 25 लाख रुपयांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

मनमाड (नैवेद्या बिदरी) :- शहरातील युनियन बँक आणि स्टेट बँकेतील घोटाळा प्रकरण ताजे असतानाच फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणूक करा बँकेपेक्षा जास्त पैसे मिळतील असे सांगून शहरातील एका डॉक्टरची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेमुळे शहरात विविध चर्चेला उधाण आले असून मनमाड शहर आर्थिक फसवणुकीचे केंद्र तर झाले नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात डॉ. शशिकांत पंडित कातकडे, (वय-३८, रा.माधव नगर, मनमाड) यांनी फिर्याद दिली. अविनाश उर्फ लखन दिलीप छाजेड, विषाल उर्फ पंल्लू दिलीप छाजेड, शोभ दिलीप छाजेड आणि दिलीप पुनमचंद छाजेड हे मनमाड शहरातील रहिवासी असून त्यांची विशाल फायनान्स एजन्सी आहे. त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा, गुंतवणूक केलेल्या रकमेवर जादा व्याज मिळेल असे सांगितल्याने जादा व्याजेच्या आमिषाने फिर्यादीने विश्वास ठेवून पैसे गुंतवले.

सन २०२० मध्ये महाराष्ट्र बँकेच्या चेक द्वारे ३ लाख रुपये शोभा दिलीप छाजेड, स्टेट बँकेच्या चेक द्वारे एक लाख रुपये शोभा दिलीप छाजेड, द नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेच्या चेक द्वारे ५० हजार शोभा दिलीप छाजेड या नावाने दिले असून एकूण शोभा दिलीप छाजेड यांच्या नावाने ४ लाख ५७ हजार रुपये चेकने दिले आहे. तर २० लाख ५० हजार रुपये रोख दिले असून एकूण २५ लाख रुपयांची गुंतवणूक विशाल फायनान्स मध्ये केली. गुंतवणुकीबाबत वेळोवेळी विचारपूस केल्यानंतर २३ लाखाचा चेक दिला मात्र बँकेमध्ये वटवण्यासाठी टाकले असता तो बाउन्स झाल्याचे समजले.

सदरील वरील व्यक्तींना चेक बाउन्स झाल्याचे सांगितल्यानंतर कोर्टात केस टाकली तर तुला पाहून घेऊ अशी दमबाजी केली आणि तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी दिली, असे कातकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मनमाड पोलीस स्थानकात विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group