मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.उद्या रविवारी (18 ऑगस्ट) रोजी रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे सह हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करणं मुंबईकरांना सोयीचं ठरणार आहे.
विविध कामांसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. दरम्यान, आपल्या लाडक्या भावाला ओवाळायला आदल्या दिवशी प्रवास करणाऱ्या बहिणींना मात्र याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करणं मुंबईकरांना सोयीचं ठरणार आहे. मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी लोकलचा प्रवास सुखकर ठरतो. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र, दर रविवारी लोकलच्या दुरुस्ती कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो.त्यामुळे मुंबईकरांचा मोठा खोळंबा होतो.
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉकअसेल. ब्लॉक कालावधीत सकाळी लांब पल्ल्याच्या जलद लोकल धीम्या मार्गाने वळवण्यात येतील. त्याचबरोबर काही लोकलसेवा पूर्णत: बंद राहतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक
सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉकची वेळ आहे. या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.
हार्बर मार्गावर ब्लॉक
सीएसएमटी ते चुनाभट्टी /वांद्रेदरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी – कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले आहे, जेणेकरून प्रवाशांचा त्रास टाळता येईल. याचा फटका मेल एक्सप्रेस गाड्यांना देखील बसणार असून, अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. त्यामुळे तुम्ही देखील रविवारीच रक्षाबंधन करण्याच्या विचारात असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.