नदी स्वच्छता मोहिमेला वाहून घेतलेले चंद्रकिशोर पाटील
नदी स्वच्छता मोहिमेला वाहून घेतलेले चंद्रकिशोर पाटील
img
Dipali Ghadwaje

मुकुंद बाविस्कर

चंद्रकिशोर पाटील हे मूळचे विदर्भातील असून, गेल्या 30 वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. त्यांचा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये इंडस्ट्रिअल मटेरियलचा व्यवसाय आहे. नंदिनी नदी स्वच्छता मोहीम व प्रदूषण विषयक जनजागृती कार्याला पाटील यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरुवात केली असून, आता त्यांचे कार्य विस्तारले आहे. केवळ नंदिनी नदीपुरतेच त्यांचे कार्य मर्यादित राहिले नसून गोदावरी व तिच्या उपनद्या, तसेच नाशिक शहर परिसरात ठिकठिकाणी असलेले कचर्‍याचे ढीग, कचरा व प्लॅस्टिक जाळणे या संदर्भातदेखील प्रबोधन व जनजागृती करण्याचे कार्य पाटील यांनी हाती घेतले आहे. शहरात जेथे कोठे कचर्‍याचे ढीग किंवा ब्लॅक स्पॉट असतात, तेथे चंद्रकिशोर पाटील जाऊन शिट्टी वाजवून कचरा टाकणार्‍याला अडवतात व सुरुवातीला त्याचे प्रबोधन करतात; मात्र त्यानंतरही कोणी ऐकले नाही तर त्याला मनपाच्या स्वच्छता विभागात दंड भरायलादेखील भाग पाडतात. त्यामुळे त्यांनी शिट्टी वाजवली तर अनेक जण घाबरून कचरा टाकत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख आता ‘व्हिसल मॅन’ म्हणून निर्माण झाली आहे.
असा केला शुभारंभ
नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात कशी झाली अशी विचारणा केली असता  पाटील यांनी सांगितले की, दसर्‍याच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो होतो. आमच्या घरासमोर नंदिनी नदी असून, तिचे नासर्डी नाल्यात रूपांतर करण्यास कचरा टाकणारे लोकच जबाबदार आहेत. ही नंदिनी नदी पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते. नवरात्री उत्सव संपला व दसर्‍याच्या दिवशी सर्व नागरिक नवरात्र उत्सवाचे पूजेचे साहित्य या नदीमध्ये टाकत असताना दिसले. तिथे जाऊन बघितले असता पूजेचे साहित्य प्लास्टिकसहित नदीत वाहत असलेल्या गटारीच्या पाण्यात पडलेले होते. इतकेच नव्हे, तर त्यावर कुत्रे, डुकरे फिरतात, असे चित्र दिसले. एक तर पवित्र पूजेचे साहित्य आणि तेही गटारीच्या पाण्यामध्ये ते वाहत होते. माझ्या मनाला पटले नाही. हा सर्व प्रकार बघून खूप दुःख झाले. आपण बंद करावे असा विचार मनात आला. काहीतरी करावे, त्यामुळे मग लोकांना याबाबत बोललो, कचरा नदीत फेकू नका, पण ते ऐकत नव्हते. त्यामुळे मग एक शिटी घेतली व जेव्हा शिटी वाजवून सुरुवात केली, तेव्हा नागरिकांनी नदीमधे कचरा फेकणे बंद केले.
मग घराघरांतील निर्माल्य जमा केले: नंदिनी नदी परिसरातीलच नव्हे तर सिडकोसह विविध भागांतील लोक येता-जाता नंदिनी नदीमध्ये निर्माल्य टाकत होते. त्यांच्याकडील सर्व निर्माल्य मी जमा करण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत चार ट्रक भरतील एवढा कचरा जमा झालेला. खूप आनंद झाला की, आपण एवढा कचरा नदीत जाण्यापासून वाचवू शकलो. अन्यथा खूप मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक नदीत जाऊन नदी आणखी प्रदूषित झाली असती, तेव्हापासून या कामाची सवयच झाली. रोज सकाळी दोन तास व रात्री दोन तास नदीकाठी उभे राहून नदीत कचरा फेकणार्‍या लोकांना शिटी वाजवून थांबविणे, हे माझे जणू काही नेहमीचे कामच झाले. त्याचप्रमाणे काही चिकन - मटण दुकानदार त्यांचा कचरा रात्री नदीत टाकायचे, ते चिकन वेस्ट सकाळी कावळे व इतर पक्षी इकडे तिकडे नेऊन संपूर्ण कॉलनीमध्ये पसरवत होते. त्यामुळे दुर्गंधी यायची. सुमारे 40 ते 50 कुत्रे त्या कचर्‍यातील मटण खाण्यासाठी येथे यायचे, ही कुत्री परिसरातील नागरिकांचा चावा घेत असत. आम्ही त्या दुकानदारांना कचरा फेकण्यास मनाई केली. तेव्हा तर ते चाकू व सुरे घेऊन भांडण करायला येत होते. शेवटी महानगरपालिका प्रशासनाला विनंती करून चिकन व मटण दुकानांसाठी स्वतंत्र कचरागाडीची व्यवस्था केली, तेव्हापासून कचरा नदीत टाकणे बंद झाले. स्थानिक नागरिकांनी चांगला सपोर्ट केला तेव्हापासून नदी स्वच्छतेची आवड वाढत गेली.
उद्यानांची स्वच्छता मोहीमही घेतली हाती : नदीमधील कचरा टाकणार्‍यांना विरोध केल्यानंतर नदी स्वच्छ दिसू लागली. या कामामध्ये मग अनेक जण सहकार्य करू लागले. माझ्यासोबत महेंद्र कंपनीमधील सेवानिवृत्त व्यवस्थापक उदय शिवदे, रोशन केदार व अनंत संगमनेरकर यासह अनेक मित्रमंडळी या कामात सहकार्य करीत आहेत. नाशिक फ्लॉगर टीममध्ये सुमारे 50 जण असून, यामध्ये तरुण मुला-मुलींचादेखील समावेश आहे. कचरा वेचण्याच्या कामात आम्हाला अनेक सामाजिक संस्था व संघटनांचा सहभाग लाभत आहे. इतकेच नव्हे तर नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेला आता चांगलेच व्यापक रूप आलेले दिसून येते. यामध्ये सामाजिक संस्था संघटनांबरोबर राजकीय पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील सहभागी होत असल्याने ही अत्यंत चांगली गोष्ट म्हणता येईल. नदी स्वच्छतेबरोबरच आम्ही उद्यान स्वच्छतेलादेखील महत्त्व दिले. शहरातील अनेक गार्डन तथा उद्यानांमध्ये नियमित साफसफाई होत नव्हती. आम्ही गार्डन स्वच्छ करण्यास सुरुवात केली. तेथील परिसरात राहणारे नागरिक व लहान मुलांना सोबत घेऊन त्यांना खेळण्यासाठी गार्डन स्वच्छ करू लागले.  
 वनाधिकार्‍यांनी घेतली चांगल्या कामाची दखल :
सन 2020 मध्ये नवरात्री उत्सवानंतर दसर्‍याच्या दिवशी नेहमीप्रमाणे नंदिनी नदीकाठी मी निर्माल्य जमा करत असताना दुपारी वन विभागाच्या अधिकारी श्‍वेता बोधदू या रस्त्याने जात असताना त्यांनी मला बघितले व हे तुम्ही का करता विचारले? मी उत्तर दिले की, एकटा सतत 17 तास काम करून माणूस एवढे प्लास्टिक नदीत जाण्यापासून वाचवतो, याचे त्यांनी कौतुक केले. इतकेच नव्हे तर त्यांनी माझ्या सोबत फोटो काढले व ट्विट केले, त्याची दखल देशभरातील सर्व मीडियाने घेतली. त्यानंतर माझे काम सर्वांना कळले. जिल्हा प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. आता प्रशासन याकामी नेहमीच मदत करत आहे. महापालिका प्रशासनाकडून आम्हाला नदी स्वच्छता मोहीम असो की प्लास्टिक जाळण्याला विरोध असो, या कामासाठी नेहमीच सहकार्य मिळते. महापालिकेचे स्वच्छता अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी येतात आणि कचरा जाळणार्‍याला तसेच टाकणार्‍याला पाचशे ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड आकारतात. त्यामुळे आता अनेक ठिकाणचे ब्लॅक स्पॉट बंद झाले असून, उद्यानांमध्येदेखील लोक कचरा टाकत नाहीत.
नद्या प्रदूषणाविरुद्ध व्यापक मोहीम राबविण्याचा मानस
नाशिकमधील गोदावरी नदी, नंदिनी नदी व इतर सर्व नद्यांवर प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नद्या या आपल्या जीवनदायिनी आहेत, परंतु आज आपल्या सर्व नद्यांची स्थिती बघितली तर खूपच वेदनादायी आहे. गटारीचे पाणी, कचरा, प्लॅस्टिकसह सर्व घाण आपण त्यामध्ये टाकत असतो. नद्या जर प्रदूषित झाल्या, तर पुढील पिढीसाठी खूप धोक्याचे आहे. आपल्या लहानपणी ज्या शुद्ध व निर्मळ पाणी असलेल्या नद्या आपण बघितल्या तेच भावी पिढीला देता यावे, यासाठी आम्ही शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या विषयी जनजागृती  करत असतो. विद्यार्थी आमच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत असतात. येणार्‍या काळात यासाठी देशभरात व्यापक प्रमाणात जनजागृती अभियान करण्याचा मानस आहे व संपूर्ण जीवन हे नदी स्वच्छतेसाठी समर्पित केले आहे.
गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात निर्माल्य व मूर्ती जमा करण्यावर भर: गणेशोत्सव काळात मूर्ती गोदावरी किंवा नंदिनी नदीत बुडवू नये, म्हणून गेल्या काही वर्षांपासून जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळेच मागील वर्षी विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने महापालिकेकडे सुमारे 1 लाख 13 हजार गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले होते. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण रोखण्यास मदत झाली. यंदादेखील अशाच प्रकारे मोहीम राबविण्यात येणार आहे.
तसेच निर्माल्यदेखील घंटागाडीमध्येच टाकायला हवे, कारण त्यानंतर त्याचे चांगले खत तयार होते. गणेशोत्सव काळात ज्याप्रमाणे मूर्तींचे संकलन होते. असाच प्रयत्न नवरात्र उत्सवातदेखील व्हायला हवा. कारण या काळात देखील मोठ्या प्रमाणावर मूर्ती आणि निर्माल्य काही जण सर्रासपणे अद्यापही नदीमध्येच टाकतात. यावर बंदी घालायला हवी, सध्या आम्ही गोदावरी नदी प्रदूषणाविरुद्ध मोहीम हाती घेतली असून, सोमेश्‍वरपासून ते तपोवनापर्यंत ठिकाणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी कार्य करीत आहोत, या कामात महापालिकेसह सर्वांचे सहकार्य लाभत असते.
नायलॉन मांजा मोहीम : मकरसंक्रांतीच्या काळात नाशिक शहरात केवळ मोकळ्या जागेतच नव्हे, तर गल्लीबोळात मुले पतंग उडवितात; परंतु यासाठी मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा वापरला जातो. हा नायलॉन मांजा अनेक झाडे, विजेचे खांब व इमारतीवर अडकतो, तसेच वाहनचालकांच्या गळ्याला त्यामुळे जखमा होतात. इतकेच नव्हे तर पक्षीही जायबंदी होतात. यासाठी आम्ही नायलॉन मांजाविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. दि. 1 ते 15 जानेवारीपर्यंत आम्ही नायलॉन मांजा बंदी तथा जप्ती मोहीम राबवितो. यासाठी आम्हाला वन अधिकार्‍यांची देखील मदत मिळते. नायलॉन मांजामुळे पक्षी कसे जखमी होतात, या संदर्भातील पोस्टर त्यांनी आम्हाला दिले होते, यासाठी आम्ही शाळा व कॉलेजमध्ये जाऊन या संदर्भात प्रबोधन करत असतो.
व्हिसल मॅन नावच पडून गेले!
 नंदिनी नदीत कचरा टाकणे बंद झाले, कारण मी येथे नेहमीच कचरा टाकणार्‍यावर लक्ष ठेवून शिट्टी तथा व्हिसल वाजवत होतो, त्यानंतर पुढे रोज गोदावरी नदीवर जाऊन कचरा टाकणार्‍यांना शिटी वाजवून थांबवू लागलो. बरेच लोक ऐकत होते, पण काही जण वाद घालायचे, आम्हाला पूजेचे साहित्य नदीच्या पवित्र पाण्यातच टाकायचे आहे, असे ते सांगत. त्यावेळी नदीचे पाणी बाटलीमध्ये भरून त्यांना ते पिण्यास दिले तर ते नाही म्हणायचे, हे घाण दूषित पाणी आम्ही नाही पिणार! तेव्हा त्यांना सांगितले हे आपण फेकलेल्या कचर्‍याने दूषित झाले आहे. तेव्हा अनेक नागरिकांना आपली चूक समजली. त्यांनी कचरा नदीत टाकणे बंद केले. कचरा टाकणे बंद झाल्याने दुर्गंधी व डास येणे बंद झाले, नंदिनी नदी आता स्वच्छ झाली असून, आम्ही दिवाळीत नदीची पूजा करतो, तर विशेष म्हणजे नंदिनीची आरतीदेखील करण्यात येते. या उपक्रमात हजारो नागरिक सहभागी होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कार्याची घेतली दखल
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मन की बात’ कार्यक्रमातून माझ्या कार्याची दखल घेतली. मार्च 2020 मध्ये आकाशवाणीवरील कार्यक्रमात मोदी यांनी माझा स्वच्छता दूत म्हणून गौरव केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वच्छतेबाबत पाटील यांचे कार्य खूपच प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. गोदावरी आणि नंदिनी नदीकिनार्‍यावर उभे राहून पाटील हे कचरा टाकणार्‍यांचे मन परिवर्तन करतात, तसेच जर कोणी तेथे कचरा करीत असेल तर त्यांना रोखतात. जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करतात आणि नदी स्वच्छता ठेवण्याची प्रेरणादेखील देतात, असेही मोदी यांनी कार्यक्रमात नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदी स्वच्छतेच्या कार्याचे कौतुक केले. मी निःस्वार्थपणे केलेल्या कार्याचे फळ मिळाले. सर्वच स्तरांतून माझे अभिनंदन झाले. महापालिकेने आता नंदिनी नदीवर जाळ्या लावल्या असून, पथदीपांची व्यवस्था केली आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group