नाशिक : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी असून नाशिकची एअर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. येत्या 29 ऑक्टोबरपासून नाशिकहून आणखी 13 शहरांसाठी हॉपिंग फ्लाईट सुरु होणार आहेत. देशातील 13 प्रमुख शहरांसाठी नाशिकहून विमानसेवा सुरू होत असल्याने वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा बेत आखणाऱ्या नाशिककरांना सुखद धक्का बसला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकची विमानसेवा अधांतरीच होती, मात्र हळूहळू आता सर्वच प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा सुरु होत असल्याने नाशिककरांकडून समाधान व्यक्त होत आहे.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या गोवा, हैद्राबाद, अहमदाबाद, नागपूर या नियमित मार्गांना व्यतिरिक्त अमृतसर, भोपाळ, चेन्नई, चंदीगड, श्रीनगर, लखनऊ, जयपूर, जैसलमेर, वाराणसी, कोची, कोलकाता, आग्रा, विजयवाडा अशा प्रमुख शहरांसाठी नाशिकहून हॉपिंग फ्लाईटसुरू होत आहे. त्याचबरोबर इंडिगो कंपनीच्या वतीने हिवाळी सत्रासाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले असून 29 ऑक्टोबरपासून राजधानी दिल्लीसह उत्तर व दक्षिण तसेच पूर्व व पश्चिम भारतात विमानसेवा विस्तारणार आहे.
दरम्यान नाशिकच्या ओझर विमानतळावरुन सध्या इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरु असून यात वरील शहरासाठी थेट सेवा सुरु आहेत. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र विंटर सीजनसाठी नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यात नवीन तेरा शहरांसाठी हॉपिंग फ्लाईट्स सुरु करण्यात येत आहेत.
यात अमृतसर, बेंगळरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, कोइमतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, जैसलमेर, कोची, कोलकता, लखनौ, तिरुअनंतपुरम, वाराणसी, आग्रा, चंडीगड, कोची, कोलकता, रायपूर, श्रीनगर, विजयवाडा या सेवा होपिंग फ्लाइट प्रकारातील आहे. त्यामुळे नाशिककरांना इतरही शहरांत सुट्ट्या साजऱ्या करता येणार आहेत. शिवाय इतर शहरातील प्रवाशांसह पर्यटकांना नाशिकचे दर्शन घेता येणार आहे. यानंतर हे वेळापत्रक बदलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
असे आहे थेट सेवेचे नवे वेळापत्रक
दरम्यान थेट सेवांमध्ये बदल करण्यात आलं असून यात नाशिक-गोवा दुपारी एक वाजता उड्डाण होईल, दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी पोचेल. तर दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी नॉर्थ गोवा येथील उड्डाण होईल, ते सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी नाशिक विमानतळावर पोचेल. अहमदाबादसाठी रात्री 9.25 मिनिटांनी उड्डाण, तर 10.50 मिनिटांनी अहमदाबादला पोहचेल. अहमदाबाद येथून सायंकाळी 7.40 मिनिटांनी उड्डाण, तर नाशिक विमानतळावर 9.05 मिनिटांनी आगमन होईल. अहमदाबादसाठी दोन फ्लाईट असल्याने दुसरी फ्लाईट सकाळी 9.15 अहमदाबाद येथून उड्डाण तर 10.35 मिनिटांनी नाशिक विमानतळावर विमान आगमन. तर नागपूरसाठी सकाळी 8.10 ओझरहून उड्डाण, ते 9.50 मिनिटांनी नागपूरला पोहचेल. सायंकाळी सातला नागपूरवरून उड्डाण, तर रात्री 8.45 वाजता नाशिक विमानतळावर आगमन. नाशिकहून हैदराबादकरिता 5.25 वाजता उड्डाण, तर 7.15 मिनिटांनी हैदराबादला पोहचेल. तर हैदराबादवरून सकाळी 10.50 मिनिटांनी उड्डाण, तर दुपारी 12.35 मिनिटांनी आगमन. सकाळी 6.45 वाजता इंदूर येथून उड्डाण, सकाळी 7.50 वाजता नाशिक विमानतळावर आगमन. तर रात्री 9.05 मिनिटांनी इंदूरसाठी उड्डाण तर 10.15 वाजता इंदूर येथे आगमन होईल.
असे आहे होपिंग फ्लाइटचे वेळापत्रक
नाशिक-अमृतसर फ्लाईट गोवा मार्गे दुपारी 1 तर रात्री 11.30 वाजता असेल. नाशिक-बेंगळरू फ्लाइट हैदराबाद मार्गे सायंकाळी 7.25 रात्री दहा असेल. नाशिक-भोपाल फ्लाईट अहमदाबादमार्गे सकाळी 11.05 तर रात्री 7.45 असेल. नाशिक-भुवनेश्वर फ्लाईट हैदराबादमार्गे सायंकाळी 7.25 रात्री 10.50 असेल. नाशिक-चेन्नई फ्लाईट गोवामार्गे दुपारी एक रात्री 5.50 तर नाशिक-दिल्ली फ्लाईट नागपूरमार्गे सकाळी 8.10 तर दुपारी 1.35 वाजता असेल. नाशिक-जयपूर फ्लाईट अहमदाबादमार्गे सकाळी 11.05 तर रात्री 8.25 ला असेल. तसेच नाशिक-कोलकता फ्लाईट हैदराबादमार्गे सायंकाळी 5.25 तर रात्री 11 वाजता असेल. तर नाशिक-वाराणसी फ्लाईट अहमदाबादमार्गे सकाळी 11.05 तर दुपारी 4.55 मिनिटांनी असेल.