नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- ट्रॅव्हल्सच्या व्यवसायवाढीसाठी महिलेकडून घेतलेले सव्वादोन लाख रुपये व तीन तोळ्यांचे दागिने परत न करता विश्वासघात करून फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आरोपी जितू वारे, त्याची पत्नी शीतल वारे व त्याचे वडील शांताराम वारे हे तिघे जण संगनमत करून फिर्यादी महिलेच्या घरी आले. वारे कुटुंबीयांचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय असून, त्या व्यवसायासाठी फिर्यादी महिलेच्या पतीने यापूर्वी बऱ्याचदा उसनवार पैसे दिले होते व ते पैसे त्यांनी वेळीच परत केले होते. त्यामुळे वारे कुटुंबीयांवर फिर्यादी यांचा विश्वास बसला होता. फिर्यादी यांचे पती हयात असताना आरोपी जितू वारे, त्याची पत्नी शीतल वारे व त्याचे वडील शांताराम वारे हे त्यांच्या घरी आले.
“आमचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून, त्यात बरीच कमाई मिळते. तुम्ही जर आम्हाला तुमच्याकडील पैसे दिले, तर आम्ही आणखी गाड्या घेऊन ट्रॅव्हल्सचा धंदा वाढवून तुम्हाला त्यात भागीदार बनवू, तसेच तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम देऊ, असे आमिष दाखविले. वारे यांच्या बोलण्याला भुलून त्यांना व्यवसायात पैसे लावण्याचे ठरविले. त्यानुसार दि. 7 एप्रिल 2015 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास चर्चा करून जितू वारे, त्याची पत्नी शीतल व वडील शांताराम वारे हे फिर्यादीच्या घरी भागीदार बनविण्यासाठी पैसे घेण्याकरिता आले.
त्यावेळी फिर्यादी यांनी 2 लाख 13 हजार रुपयांची रक्कम जितू वारे याच्याकडे दिली, तसेच तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, आणखी रक्कम जमा करण्याकामी गहाण ठेवण्यासाठी जितू वारे याच्याकडे दिले होते. या व्यवहाराची लिखापढी करण्यास सांगितले असता आपण नंतर करून घेऊ, असे आरोपी वारे याने सांगितले होते. त्यानंतर वारे कुटुंबीयांनी ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी दोन गाड्या विकत घेतल्या; परंतु पाच-सहा महिने आरोपींनी फिर्यादी चौधरी यांना काहीच रक्कम दिली नाही, म्हणून फिर्यादी या वारे यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेल्या असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
सन 2016 मध्ये फिर्यादीचे पती मयत झाल्याने त्यांना पैशाची अडचण भासू लागली. पैसे मागण्यासाठी गेले असता जितू वारे याचे वडील यांनी स्पष्ट सांगितले, की आम्ही तुमचे सोने परत करू शकत नाही, तर जितू वारे याने सोने व पैसे मागायला आले, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत धमकी दिली, तसेच स्त्रीमनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला.
यावेळी आरोपी शीतल वारे हिने फिर्यादी महिलेचे केस धरून तिला हाताच्या चापटीने मारहाण केली, तसेच तुझा मुलगा यापुढे पाणीपुरीची गाडी कशी चालवितो, ते आम्ही पाहतो. पुन्हा पैसे व सोने मागायला आली, तर तुला सोडणार नाही, अशी दमबाजी केली.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वारे कुटुंबीयांविरुद्ध फसवणुकीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.