दिल्ली, मुंबईत परिस्थिती भयंकर! वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावली
दिल्ली, मुंबईत परिस्थिती भयंकर! वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावली
img
Dipali Ghadwaje
मुंबई : तापमानामध्ये होणाऱ्या चढउतारामुळे मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आलं असून चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावल्याचं लक्षात घेता सरकारने शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.  

तापमानामध्ये होणाऱ्या चढउताराचा परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता चांगलीच खालावली आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात आर्द्रता असली, तरी दिवसभर ही आर्द्रता राहत नाही. परिणामी मुंबईवर दिसणारी धुरक्याची चादर सातत्याने टिकून आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांकानुसार, गुरुवारी सकाळी वरळी येथे २५४, वांद्रे-कुर्ला संकुल येथे २०१, कुलाबा येथे २०३ अशा निर्देशांकांची नोंद झाली. हे निर्देशांक हवेची वाईट गुणवत्ता नोंदवत होते. त्यानंतर दुपारनंतर हवेची दिशा बदलल्यावर गुरुवारी संध्याकाळी केवळ कुलाबा येथे हवेची गुणवत्ता वाईट होती.

मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी ही आतापर्यंत चांगल्या श्रेणीमध्ये गणली जात होती. मात्र, आता हीच हवा मॉडरेट श्रेणीमध्ये गणली जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा तर नाही ना? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर मुंबईकरांना आता काळजी घेण्याची गरज आहे.

तर दुसरीकडे दिल्लीत दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. वाढते वायू प्रदूषण लहान मुले आणि वृद्धांसाठी धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे सरकारने सर्व प्राथमिक सरकारी आणि खाजगी शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर फक्त पाचवीपर्यंतच्या शाळा बंद राहतील, असं देखील यावेळी केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group