गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान जळगाव शहरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील संजय गांधी सहकारी सूतगिरणी जवळील वळणावर रोडच्या कडेला उभ्या असलेल्या तीन शेतमजूर महिलांना भरधाव वेगात आलेल्या क्रेटा कारने चिरडले. या अपघातात आसलगाव येथील मायलेकीसह ६५ वर्षीय वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की , शेतीची कामे आटोपून तीनही महिला रस्त्याने घरी जात असताना सूतगिरणी जवळील असलेल्या मोठ्या वळणावर या तीन महिला उभ्या असताना नांदुरा येथून भरधाव वेगात येत असलेल्या क्रेटा गाडी क्रमांक एम एच २८ ए झेड ३९९७ च्या गाडी चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून महिलांच्या अंगावर गाडी नेली.
या अपघातात तीनही महिला गंभीररीत्या जखमी झाल्या. स्थानिकांना धाव घेऊन त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेले. रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्यामधील नंदाबाई महादेव दांडगे वय ५० वर्ष व मुलगी वैष्णवी महादेव दांडगे वय १७ वर्षे या मायलेकीचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
तर बेबाबाई लक्ष्मण घोपे यांचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खामगाव येथे रेफर करण्यात आले होते. खामगाव येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.