नाशिक (प्रतिनिधी) :- विरुद्ध दिशेने वाहनास जाण्याची मुभा देऊन त्या बदल्यात ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघा पोलीस नाईकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, की आरोपी कैलास रामदास गोरे, संतोष उत्तम माळोदे हे दोघेही महामार्ग पोलीस केंद्र, घोटी येथे नेमणुकीस होते.
यातील तक्रारदार यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून, त्यांचा ट्रेलर हा मुंबईच्या दिशेकडून इगतपुरीच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरून जात असताना या ट्रेलरला कसारा येथील घाटातून इगतपुरीकडे विरुद्ध दिशेने जाण्याची मुभा देऊन हा घाट ओलांडून, तसेच पार करून देण्याच्या मोबदल्यात दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, तसेच हा घाट पार करून महामार्ग पोलीस केंद्र, घोटी (ता. इगतपुरी) येथे आल्यावर आरोपी संतोष माळोदे यांनी तडजोडीअंती 15 हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारण्याचे मान्य केले. म्हणून दोघा जणांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक गायत्री जाधव, तपास अधिकारी संदीप घुगे व ज्योती शार्दूल, पोलीस हवालदार अनिल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल नितीन नेटारे यांनी पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.