नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारवाईचा धडाका सुरूच असून लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 5 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय 39) ग्रामसेवक देवगांव, पारगाव रा. चोपडा ता. चोपडा जि.जळगांव असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे पारगाव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता.
त्याप्रमाणे ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला /बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे 7500 रुपयांची लाचेची मागणी केली. काल लाच मागणीची पडताळणी केली असता तडजोडीअंती त्यांना पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अडावड पोलीस स्टेशन ता. चोपडा जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला.