मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ
मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर भुजबळांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

खुद्द छगन भुजबळ यांनीच माध्यमांना यासंदर्भातली माहिती दिली आहे. भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात हे धमकीचं पत्र आलं असून त्यामध्ये “तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी घेतली आहे”, असा उल्लेख असल्याचंही भुजबळांनी सांगितलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?
नाशिक येथील त्यांच्या कार्यालयात हे धमकीचं पत्र आलेलं आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची सुपारी मारेकऱ्यांनी घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय, त्यांना ठार करण्याचा कट रचण्यासाठी कुठल्या हॉटेलसमोर बैठक झाली. त्यातील गाड्यांचे क्रमांक काय आहेत वगैरे अशी माहिती देण्यात आल्याचं भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ सध्या राज्यात चर्चेचा विषय आहेत. कारण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश झाल्यास ओबीसींमधील इतर जातींचा आरक्षणाचे फायदे मिळणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यातूनच मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. यापूर्वी देखील भुजबळ यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी आली होती. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group