मनोज जरांगे पाटील आठ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यातच जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. अनेक नेते आंदोलकांना भेटण्यासाठी जात आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. पण अद्याप तोडगा निघालेला नाही. आंदोलन सुरूच आहे.
दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातील घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी सरकारला इशारा आहे.
काय म्हणाले बच्चू कडू
“सरकारने अंत पाहू नये. अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही,” असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. जालन्यातील जरांगे-पाटलांच्या उपोषणाला बच्चू कडू यांनी भेट दिली. तेव्हा ते बोलत होते.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, “महाराष्ट्रातील मराठा कुणबी असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ज्यांच्या सरकारी दफ्तरी नोंदी कुणबी आहेत, त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यास सरकारने सुरू करावे. यासाठी आम्ही सुद्धा आग्रही राहणार आहोत. पण, सरकारने अंत पाहू नये. नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही.”
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेत मराठा आरक्षण आणि समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक सोमवारी ( ४ सप्टेंबर ) सह्याद्री अतिथिगृह येथे झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील महसून आणि शैक्षणिक अभिलेख तपासण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.या समितीकडे मराठावाड्यातील पाच जिल्ह्यांतून कुणबी समाजाची माहिती संकलित झाली आहे. त्याशिवाय हैदराबाद येथून निझामाचे जुने अभिलेख तातडीने तापसण्यात येत आहे, अशी माहिती महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी बैठकीत दिली.