नाशिक :- 50 हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण उप संचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
दिगंबर अर्जुन साळवे (वय ५५, रा. टाकळी, भीमशक्ती नगर, नाशिक) असे लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत दि. 13/12/2019 पासून ते 31/12/2022 पर्यंत शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आली. त्यानंतर ते दिनांक 1 जानेवारी 2023 पासून ते आज पर्यंत या शाळेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही.
हे वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील कनिष्ठ लिपिक साळवे यांनी तक्रारदाराकडे 50,000 रुपये लाचेची मागणी केली. साळवे यांना काल नाशिक शिक्षण उप संचालक कार्यालयात घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बडगुजर, पो.ना, मनोज पाटील, पो.ना दिपक पवार, म पो.अम. शितल सूर्यवंशी यांनी केली.