१९ ऑगस्ट २०२३
नाशिक (प्रतिनिधी):- थकीत घरभाडे प्रकल्प अधिकाऱ्याकडून मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या लेखा अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
भास्कर रानोजी जेजुरकर (वय 53, सध्या रा. कुलस्वामिनी रो हाऊस, नंबर 2, भवानी पार्क, भगवतीनगर, हिरावाडी, नाशिक) असे लाच घेणाऱ्या लेखा अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीचे आंबोली ता.त्र्यंबक येथील गट नं.79/2 व 79/3 मध्ये इमारत क्र. 422/1, 422/2 असे दोन वसतिगृह आहेत. त्यापैकी 422/1 ही 99,998 रुपये मासिक दराने तर 422/2 ही इमारत 55,088 रुपये मासिक दराने तक्रारदार यांच्या वडिलांनी सन 2021 ते 2024 म्हणजे 3 वर्षासाठी शासकीय आश्रमशाळा,आंबोली (ता.त्र्यंबक) यांना भाडेतत्त्वावर दिलेली आहे.
त्यापैकी इमारत क्रमांक 422/1 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे एकूण घरभाडे 2,93,994 रुपये तसेच इमारत क्रमांक 422/2 चे एप्रिल ते जून पर्यंतचे एकूण घरभाडे 1,65,264 रुपये असे दोन्ही इमारतीचे मिळून एकूण 4,59,258 रुपये थकित घरभाडे मिळण्यासाठी बिले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक यांच्याकडे पाठविण्यात येणार होते, तसेच सदर बिल लेखा अधिकारी भास्कर जेजुरकर यांच्याकडे पडताळणीसाठी प्रलंबित होते.
या बिलांची पडताळणी करून प्रकल्प अधिकारी, नाशिक यांच्याकडे मंजुरीकरीता सादर करण्यासाठी भास्कर जेजुरकरयांनी दि.17 ऑगस्टला लाचेची मागणी केली. त्यानंतर लाच मागणी केल्याची पडताळणी पंचनामावेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. इतकेच नव्हे तर मागणी केलेली लाचेची रक्कम काल लाच स्वीकारली. त्यामुळे आरोपी जेजूरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright ©2024 Bhramar