जुने नाशिकमध्ये  गाड्या जाळणाऱ्या
जुने नाशिकमध्ये गाड्या जाळणाऱ्या "या" पाच आरोपींना अटक
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- जुने नाशिक परिसरात गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या पाच आरोपींना भद्रकाली पोलिसांनी शनिशिंगणापूर व नाशिक येथून अटक केली आहे. भद्रकाली पोलिसांनी केलेल्या या तपासाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की दि. 16 मे 2024 रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या नाशिकमधील वाकडी बारव, नानावली, झाकीर हुसेन हॉस्पिटलसमोर व शितळादेवी मंदिरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी नऊ मोटारसायकल, एक ट्रक व टेम्पो यांना आग लावून या वाहनांची जाळपोळ केली होती. जहांगीर कब्रस्तानजवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये असताना निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी होते. घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास सुरू केला होता.


या काळात निवडणुकीचा बंदोबस्त असतानाही पोलीस लक्ष देऊ शकले नाही असे स्वरूपाचा आरोप जुने नाशिक भागातून केला जात होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हे सर्व सुरू असताना लोकसभा निवडणूक झाली आणि त्या दिवशी रात्री देखील पंचवटीतील दत्तनगर भागामध्ये भाजप नेते उत्तमराव उगले यांच्या सोसायटीमध्ये देखील अज्ञात व्यक्तींनी गाड्यांची तोडफोड केली होती. त्यामुळे शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान या सर्व घटनांची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोध पथकाने याबाबत तपास सुरू केला. या परिसरातील सीसीटीव्हीचे पाहणी करून त्याचे फुटेज घेतले आणि त्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. विना नंबरची गाडी आणि तोंडाला फडके बांधून काही व्यक्ती या परिसरात आल्याचे सीसीटीव्हीत दिसले होते. तो धागा पकडून भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

या गुन्ह्यातील सर्व आरोपी शनिशिंगणापूर येथे एका लॉजमध्ये लपून बसल्याचे गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक शनिशिंगणापूर येथे पोहोचले आणि तपास सुरू करत असताना एका लॉजमध्ये पाचही आरोपी असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित दोघांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

यांना केली अटक

सनी संजय गावडे (वय 28, रा. पिंपळे गल्ली, म्हसरूळ), प्रशांत बाळासाहेब फड (वय 31, रा. विद्यानगर, मखमलाबाद), प्रवीण बाळू कराटे (वय 24, रा. विद्यानगर, मखमलाबाद), आकाश राजू साळुंके (वय 24, रा. सिडको), विजय सुरेश लोखंडे (वय 28, रा. आडगाव).

इतर बातम्या
Join Whatsapp Group