नवीन नाशिक (प्रतिनिधी) :- अंबड औद्योगिक वसाहतीत गुरुवारी दिवसभरात तब्बल आठ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या कामांचा खोळंबा झाला. शनिवारी वीजपुरवठा बंद असतो, मात्र कालही बंद झाल्याने उद्योजकांना त्रास सहन करावा लागला.
काल सकाळी काही तांत्रिक कारणामुळे औद्योगिक वसाहतीतील बहुतेक भागांत जवळपास आठ तास वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे अनेक कंपन्यांमध्ये कामे बंद करण्यात आली होती.
छोट्या-मोठ्या कंपन्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतर वेळेस फक्त शनिवारीच वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे त्याबाबत अनेक कंपन्या कामगारांना सुट्या देतात व काम बंद ठेवतात. मात्र इतर दिवशी अशा पद्धतीने वीज गायब झाल्यास मोठे नुकसान सहन करावे लागते. एकीकडे वीज मंडळाचे वाढलेले अव्वाच्या सव्वा दर, तर दुसरीकडे खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कंपनीच्या सर्वच मशीनरी या विजेवर चालतात. त्यातच अचानकपणे सर्वच काम बंद पडल्याने नियोजन बिघडते. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते, अशी प्रतिक्रिया उद्योजक सचिन महाजन यांनी दिली.
तांत्रिक अडचणी होत्या आता पुरवठा सुरळीत
विद्युत पारेषणच्या काही तंत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे काही दुरुस्ती करण्यात आली. अनेक उद्योजक संपर्कात होते. पुरवठा खंडित होता. सायंकाळनंतर सुरळीत करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण औद्योगिक वसाहत अंबडचे वीज वितरण अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिले.