नाशिक (प्रतिनिधी) :- लिपिकपदाकरिता होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पेपरची कॉपी करण्याच्या उद्देशाने सँडलमध्ये लपवून आणणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
सूरज विठ्ठलसिंग जारवाल (वय 23, रा. जारवालवाडी, सागरवाडी, पो. धासला, ता. बदनापूर, जि. जालना) हा काल (दि. 22) म्हसरूळ येथील पुणे विद्यार्थी गृह येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक या पदाकरिता होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी आला होता. त्यावेळी त्याने परीक्षा केंद्रात मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस परीक्षेच्या पेपरची कॉपी करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील सँडलमध्ये लपवून घेऊन आला होता, तसेच निर्बंध असलेल्या वस्तू परीक्षा केंद्रात आणून शासनाने परीक्षेसंदर्भात दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून फौजदारी गुन्ह्यास पात्र असा कट रचून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने सूरज जारवाल हा परीक्षा केंद्रात मिळून आला.
या प्रकरणी ऋषिकेश गोकुळ कांगणे (वय 25, मु. पो. तळेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयित सूरज जारवाल याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.