नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- खोट्या सह्या व बनावट दस्तऐवज तयार करून शेतजमीन नावे करून जावई व नातू यांसह मुलीने एका इसमाच्या मदतीने वृद्ध वडिलांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी लक्ष्मण हरिभाऊ गांगुर्डे (वय 66, रा. सामनगाव रोड, सिन्नर फाटा, नाशिकरोड) हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत. त्यांच्या पत्नीचे कोरोनाच्या काळात निधन झाले असून, त्यांची बहीण रेखा हरिभाऊ गांगुर्डे ही मनोरुग्ण असून, तिचा सांभाळ ते करतात.
गांगुर्डे यांची मौजे तुकडी जिल्हा नाशिक पोटतुकडी जिल्हा नाशिक महानगरपालिका हद्दीतील मौजे देवळाली गाव शिवारातील शेत मिळकत सर्व्हे नंबर 217, हिस्सा क्रमांक 5-2 यांसी एकूण क्षेत्र 00.27 आर या क्षेत्रापैकी फिर्यादी यांच्या पत्नीच्या हिश्श्याचे क्षेत्र हेक्टर 00.02 आर. हे क्षेत्र आहे. या क्षेत्रावर फिर्यादी गांगुर्डे यांची या ठिकाणी तीन रूमच्या बांधीव घराची मिळकत आहे. दरम्यान, फिर्यादी यांची पत्नी दि. 15 एप्रिल 2021 रोजी कोरोनामुळे मयत झाली. त्यावेळी फिर्यादी गांगुर्डे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी आरोपी मुलगी अर्चना संजीवन खराडे (वय 40), जावई संजीवन प्रकाश खराडे (वय 52), नातू विश्वेश संजीवन खराडे (वय 18, तिघेही रा. उत्कर्ष पॅलेस, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांनी अन्य आरोपी संजय तुळशीराम गाडेकर (वय 55, रा. गाडेकर मळा, सिन्नर फाटा, नाशिकरोड) यांच्याशी संगनमताने कटकारस्थान रचले.
फिर्यादी यांची नमूद असलेली मिळकत फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करून बनावट दस्तऐवज तयार करून ही मिळकत आरोपी मुलगी संजीवन खराडे हिच्या नावे करून फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी गांगुर्डे यांची बहीण रेखा हरिभाऊ गांगुर्डे यांनी फिर्यादी यांची मुलगी अर्चना खराडे, जावई संजीवन खराडे, नातू विश्वेश खराडे व संजय गाडेकर यांना या फसवणुकीबाबत जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच सर्व आरोपींनी मिळून रेखा गांगुर्डे यांना मारहाण व शिवीगाळ करीत “तू जर मिळकतीमध्ये हिस्सा मागितलास, तर तुला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सन 2021 मध्ये सामनगाव रोड, सिन्नर फाटा येथे घडला होता.
या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण गांगुर्डे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशावरून फिर्यादी मुलगी, जावई, नातू व अन्य एक इसम यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.